विशाल भारद्वाज करणार ओटीटीवर पदार्पण
चित्रपट निर्माते-लेखक-संगीतकार विशाल भारद्वाज यांना ‘कमीने’, ‘ओमकारा’, ‘मकबूल’ आणि अनेक अन्य चित्रपटांसाठी ओळखले जाते. भारद्वाज आता लवकरच वेबसीरिजद्वारे प्रेक्षकांना सामोरे जाणार आहेत. त्यांच्या या वेबसीरिजची कहाणी ब्रिटिश लेखिका अगाथा क्रिस्टी यांची कादंबरी ‘द सिटाफोर्ड मिस्ट्री’वर आधारित असणार आहे.

‘चार्ली चोपडा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली’ नावाची ही सीरिज हिमाचल प्रदेशातील पार्श्वभूमी दर्शविणारी असणार आहे. यात चार्ली चोपडा या व्यक्तिरेखेचा प्रवास अन् एक रहस्य उघड करण्याच्या तिच्या शोधाभोवती याची कहाणी घुटमळणार आहे.
विशाल भारद्वाज हे अंजुम राजाबली तसेच ज्योत्स्ना हरिहरन यांच्यासोबत सह-पटकथा लेखक म्हणून काम पाहत आहेत. अगाथा क्रिस्टी यांच्या सर्व कहाण्या वाचतच मी लहानाचा मोठा झालो आहे. त्यांची कहाणी मांडणारी शैली आजही कथाकारांना उत्साहित करते असे भारद्वाज यांनी सांगितले आहे.
या सीरिजमध्ये वामिका गब्बी, प्रियांशु पेंयुली, नसीरुद्दीन शाह, नीना गुप्ता, रत्ना पाठक शाह, गुलशन ग्रोव्हर, लारा दत्ता आणि चंदन रॉय सान्याल यासारखे प्रभावी कलाकार दिसून येणार आहेत. अगाथा क्रिस्टी यांचे नातू जेम्स प्राइसहार्डसोबत हा अविश्वसनीय प्रवास राहिला असल्याचे भारद्वाज म्हणाले.
अगाथा क्रिस्टी लिमिटेडकडून जेम्स प्रिचर्ड, बासी अकपाबियो आणि लियो देजोयसा हे सीरिजचे कार्यकारी निर्माते असणार आहेत. सीरिजची निर्मिती विशाल भारद्वाजच्या होम बॅनर अंतर्गत होणार आहे. ही सीरिज लवकरच सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.









