वृत्तसंस्था/ मेलबर्न
2022 साली विंडीजमध्ये होणाऱया आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या युवा पुरूषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अष्टपैलू कूपर कोनोलीची कर्णधारपदी निवड केली आहे. या स्पर्धेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रविवारी आपल्या संघाची घोषणा केली.
16 वर्षीय अष्टपैलू कूपर कोनोलीची ही आयसीसीची दुसरी विश्वचषक युवा क्रिकेट स्पर्धा आहे. 2020 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेसाठी कोनोलीची पहिल्यांदा निवड करण्यात आली होती. कोनोलीने दक्षिण आफ्रिकेत दोन सामने खेळले असून त्याने बेनोनी येथे झालेल्या विंडीजविरूद्धच्या सामन्यात 53 चेंडूत 64 धावा झळकविल्या होत्या. 19 वर्षांखालील वयोगटाच्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत 16 वर्षीय कोनोलीने चौथ्यांदा अर्धशतक झळकविले होते. कोनोलीकडे फलंदाजीचा उत्तम दर्जा असल्याने त्याची यावेळी ऑस्ट्रेलियन युवा संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियन युवा संघ- कूपर कोनोली (कर्णधार), हरकिरत बावा, कॅहील, गार्नर, हिगिन्स, केलावे, मिलर, निसबेट, एन. राधाकृष्णन, सेलझमन, लाछलन शॉ, सिनफिल्ड, स्नेल, व्हिटेनी आणि विली.









