वृत्तसंस्था/ लाहोर
तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत गुरुवारी येथे झालेल्या दुसऱया सामन्यात यजमान पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा 6 गडय़ांनी पराभव करून 1-1 अशी बरोबरी साधली. पाकचा कर्णधार बाबर आझम आणि इमाम उल हक यांनी शानदार शतके झळकविली.
या सामन्यात बाबर आझमने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाला 50 षटकात 8 बाद 348 धावा जमवित पाकला विजयासाठी 349 धावांचे अवघड आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलियाच्या डावात बेन मॅकडरमॉटने शानदार शतक (104) झळकवले. हेडने 89, लाबुशानेने 59 आणि स्टोइनिसने 49 धावा जमविल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकने 49 षटकात 4 बाद 349 धावा जमवित आपला विजय नोंदविला. बाबर आझमने 83 चेंडूत 114 तर इमाम उल हकने 106 धावा झळकविल्या. खुशदिल शहा आणि इफ्तीकार अहमद या जोडीने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. शहाने 17 चेंडूत नाबाद 27 तर इफ्तीकार अहमदने नाबाद 8 धावा जमविल्या. पाक संघाचा ऑस्ट्रेलियावरील हा थरारक विजय म्हणावा लागेल. पाकच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध यापूर्वी सलग दहा सामन्यात पराभवाची मालिका पाकने यावेळी खंडित केली. या मालिकेतील दोन दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकचा पराभव करत आघाडी मिळविली होती. या पहिल्या सामन्यात इमाम उल हकचे शतक वाया गेले होते. ऑस्ट्रेलियाने हा पहिला सामना 88 धावांनी जिंकला होता. या मालिकेतील इमाम उल हकचे हे सलग दुसरे शतक आहे. गुरुवारच्या दुसऱया सामन्यात इमाम उल हकने फख्र झमानसमवेत 118 धावांची भागिदारी केली. झमानने 67 धावा झळकविल्या. स्टोइनिसने फख्र झमानला त्रिफळाचीत केले. कर्णधार बाबर आझमने ऑस्ट्रेलियाच्या झाम्पा आणि स्वेपसन यांच्या फिरकी गोलंदाजीसमोर आक्रमक फलंदाजी करत आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेले. इमाम उल हकने आपल्या 106 धावांच्या खेळीमध्ये 3 षटकार आणि 6 चौकार नोंदविले. डावातील 35 व्या षटकात तो झाम्पाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. कर्णधार बाबर आझमने 71 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. डावातील 45 व्या षटकात तो बाद झाला. पाकला यावेळी विजयासाठी 40 धावांची जरुरी होती. इलिसच्या गोलंदाजीवर बाबर आझम लाबुशानेकरवी झेलबाद झाला. खुशदिल शहाने आपल्या नाबाद 27 धावांच्या खेळीमध्ये 2 षटकार आणि 2 चौकार नोंदविले. या मालिकेतील आता तिसरा आणि शेवटचा सामना शनिवारी येथे खेळविला जाईल. तब्बल 24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकच्या दौऱयावर यावेळी कसोटी, वनडे मालिका खेळत आहे. या वनडे मालिकेनंतर उभय संघात एकमेव टी-20 सामना पुढील मंगळवारी होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया 50 षटकात 8 बाद 348 (मॅकडरमॉट 104, हेड 89, लाबुशाने 59, स्टोइनिस 49), पाक 49 षटकात 4 बाद 349 (बाबर आझम 114, इमाम उल हक 106, फख्र झमान 67, खुशदिल शहा नाबाद 27, इफ्तीकार अहमद नाबाद 8).









