मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुरचा भेदक मारा, ऑस्ट्रेलियाला 294 धावांवर रोखण्यात यश
ब्रिस्बेन / वृत्तसंस्था
बोर्डर-गावसकर चषक स्पर्धेतील भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी व शेवटची कसोटी रंगतदार वळणावर पोहोचली असून एकीकडे, भारताला विजयासाठी 328 धावांची आवश्यकता आहे तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलियासमोर भारताचा डाव शक्य तितक्या लवकर गुंडाळण्याचे आव्हान आहे. चौथ्या दिवसाच्या खेळात पावसाचा व्यत्यय आला होता. त्यामुळे, आज शेवटच्या दिवसात त्याची पुनरावृत्ती झाली तर ते कोणाच्या पथ्यावर पडेल, हे देखील पहावे लागेल.
चौथ्या डावात विजयासाठी 328 धावांचे आव्हान असताना रोहित शर्मा (6 चेंडूत नाबाद 4), शुभमन गिल (5 चेंडूत नाबाद 0) यांनी सावध पवित्र्यावर भर दिला. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 75.5 षटकात सर्वबाद 294 धावांवर गुंडाळण्यात सिराज व शार्दुलचा भेदक मारा अतिशय निर्णायक ठरला. सिराजने 19.5 षटकात 73 धावात ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गारद केला तर शार्दुलने 19 षटकात 61 धावात 4 बळी घेतले. उर्वरित 1 बळी वॉशिंग्टन सुंदरने घेतला.
ब्रिस्बेनवर चौथ्या डावात सर्वाधिक 236 धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला आहे आणि तेही 7 दशकांपूर्वी. याशिवाय, ऑस्ट्रेलियाने 1988 नंतर या मैदानावर एकही कसोटी गमावलेली नाही, यावरुन यजमान संघाची येथील हुकूमत अधोरेखित होते. पण, अर्थातच, सिराज व शार्दुलच्या तिखट माऱयामुळे भारताला ऑस्ट्रेलियावर अपेक्षेपेक्षा अधिक वर्चस्व गाजवता आले.

आजही पावसाचा व्यत्यय?
या सामन्यातील पाचव्या दिवसाच्या खेळात पावसाची अपेक्षा असल्याने हा देखील आणखी एक रंजक घटक असेल. सोमवारच्या खेळात पावसाचे तळय़ात-मळय़ात सुरु असताना ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनच्या चेहऱयावरील रेषाही बदलत राहिल्या होत्या. मोहम्मद शमी व बुमराह हे भारताचे बिनीचे गोलंदाज येथे खेळू शकले नाहीत. पण, सिराज व शार्दुल यांनी जो तिखट मारा केला, त्यावरुन भारताची पुढील फळीही सज्ज आहे, याचाच जणू येथे दाखला मिळाला आहे.
सिराजने प्रतिस्पर्धी संघातील दोन अव्वल फलंदाज मार्नस लाबुशाने (22 चेंडूत 25) व स्टीव्ह स्मिथ (74 चेंडूत 55) यांना बाद करताना जे कसब दाखवले, ते निव्वळ वाखाणण्याजोगे ठरले. आश्चर्य म्हणजे हे दोन्ही चेंडू अतिशय विभिन्न होते. एकीकडे ऑफस्टम्पवर टाकलेला फुल्लर लेंग्थ चेंडू लाबुशानेच्या बॅटची कड घेऊन दुसऱया स्लीपवरील रोहितच्या हातात विसावला तर स्टीव्ह स्मिथला ‘हेवी बॉल’ कसा असतो, याची चुणूक दाखवून देत सिराजने त्याला गलीवर तैनात अजिंक्य रहाणेकडे झेल देणे भाग पाडले.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया डावातील प्रारंभी डेव्हिड वॉर्नर (75 चेंडूत 48) व मार्कस हॅरिस (82 चेंडूत 38) या सलामीवीरांनी जोरकस फलंदाजी साकारली. पण, हे दोघेही बाद झाल्यानंतर भारताच्या आशाअपेक्षा पुन्हा पल्लवित झाल्या. दुसऱया सत्रात सिराजची ऑस्ट्रेलियन फलंदाजांशी बरीच जुगलबंदी रंगली आणि यातून जे दडपण निर्माण झाले, त्याचा शार्दुलनेही उत्तम लाभ घेतला.
धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव : सर्वबाद 369
भारत पहिला डाव : सर्वबाद 336
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव ः मार्कस हॅरिस झे. पंत, गो. शार्दुल 38 (82 चेंडूत 8 चौकार), डेव्हिड वॉर्नर पायचीत गो. वॉशिंग्टन सुंदर 48 (75 चेंडूत 6 चौकार), मार्नस लाबुशाने झे. शर्मा, गो. सिराज 25 (22 चेंडूत 5 चौकार), स्टीव्ह स्मिथ झे. रहाणे, गो. सिराज 55 (74 चेंडूत 7 चौकार), मॅथ्यू वेड झे. पंत, गो. सिराज 0 (3 चेंडू), कॅमेरुन ग्रीन झे. शर्मा, गो. शार्दुल 37 (90 चेंडूत 3 चौकार), टीम पेन झे. पंत, गो. शार्दुल 27 (37 चेंडूत 3 चौकार), पॅट कमिन्स नाबाद 28 (51 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), मिशेल स्टार्क झे. सैनी, गो. सिराज 1 (4 चेंडू), नॅथन लियॉन झे. अगरवाल, गो. शार्दुल 13 (10 चेंडूत 1 षटकार), जोश हॅझलवूड झे. शार्दुल, गो. सिराज 9 (11 चेंडू). अवांतर 13. एकूण 75.5 षटकात सर्वबाद 294.
गडी बाद होण्याचा क्रम
1-89 (हॅरिस, 24.6), 2-91 (वॉर्नर, 25.6), 3-123 (लाबुशाने, 30.3), 4-123 (मॅथ्यू वेड, 30.6), 5-196 (स्मिथ, 54.2), 6-227 (ग्रीन, 60.5), 7-242 (पेन, 64.6), 8-247 (स्टार्क, 67.3), 9-274 (लियॉन, 72.1), 10-294 (हॅझलवूड, 75.5).
गोलंदाजी
सिराज 19.5-5-73-5, टी. नटराजन 14-4-41-0, वॉशिंग्टन सुंदर 18-1-80-1, शार्दुल ठाकुर 19-2-61-4, नवदीप सैनी 5-1-32-0.
भारत दुसरा डाव (टार्गेट 328) ः रोहित शर्मा खेळत आहे 4 (6 चेंडूत 1 चौकार), शुभमन गिल खेळत आहे 0 (5 चेंडू). एकूण 1.5 षटकात बिनबाद 4.
गोलंदाजी
मिशेल स्टार्क 1-0-4-0, हॅझलवूड 0.5-0-0-0.
ब्रिस्बेन गाजवणारे भारतीय गोलंदाज
पृथक्करण / गोलंदाज / वर्ष
6-104 / इरापल्ली प्रसन्ना / जानेवारी 1968
5-55 / बिशनसिंग बेदी / डिसेंबर 1977
5-72 / मदनलाल / डिसेंबर 1977
5-73 / मोहम्मद सिराज / जानेवारी 2021
5-95 / झहीर खान / डिसेंबर 2003
4-61 / शार्दुल ठाकुर /जानेवारी 2021
4-80 / कपिलदेव / नोव्हेंबर 1991
सिराज म्हणतो, बिर्याणी कमी केली आणि तंदुरुस्त झालो!
मी माझ्या यशाचे श्रेय प्रामुख्याने माझ्या ट्रेनर्सना देऊ इच्छितो. सोहम भाईने (देसाई) माझा आहार कसा असावा, हे ठरवून दिले आणि त्याचे काटेकोर पालन होते का, हे देखील पाहिले. प्रोटिनवर त्यांचा अधिक भर होता. त्यातून मला बिर्याणी कमी करावी लागली. पण, याच बरोबरीने विशेषतः लॉकडाऊन कालावधीत तंदुरुस्ती व सराव यावर मेहनत घेतली आणि त्याची पोचपावती या दौऱयात मिळाली, असे मोहम्मद सिराज आभासी पत्रकार परिषदेत म्हणाला. माझी ही कामगिरी पाहण्यासाठी आज वडील असायला हवे होते, असेही तो भावूक होत म्हणाला.
‘मी स्वतःला वरिष्ठ गोलंदाज मानत नाही. पण, बरेचसे प्रथमश्रेणी व अ श्रेणीचे क्रिकेट खेळले असल्याने हा अनुभव माझ्यासाठी फलद्रुप ठरला. जसप्रित बुमराह नसल्याने माझ्यावर अनेक मर्यादा होत्या आणि मला काही वेगळे प्रयोग करता आले नाहीत. मात्र, प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवण्यासाठी मी हरसंभव प्रयत्न केले. प्रथम काही इनस्विंग चेंडू टाकल्यानंतर अचानक आऊटस्विंग गोलंदाजी केली, हा त्याचाच एक भाग होता’, असे सिराजने यावेळी आवर्जून सांगितले.
खेळपट्टीवर तडे आहेत, सावध खेळा!
गब्बाच्या या खेळपट्टीला अनेक तडे पडले आहेत. त्यामुळे, चेंडूचा टप्पा त्यावर पडला तर अचानक कशीही दिशा बदलून चेंडू वळू शकतो. त्यामुळे, आपल्या फलंदाजांना विशेष दक्ष रहावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा सिराजने येथे दिला.
या मालिकेत 13 बळी घेतले, त्यात स्टीव्ह स्मिथला बाद केले, तो चेंडू माझ्या दृष्टीने सर्वोत्तम आहे, याचाही त्याने उल्लेख केला. ‘स्टीव्ह स्मिथ जागतिक स्तरावरील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे आणि एका टप्प्यावर अचूक चेंडू पडला तर तो उत्तम उसळू शकेल, असा माझा होरा होता. माझ्या सुदैवाने चेंडू अगदी अपेक्षित टप्प्यावर पडला आणि स्मिथकडून चूक झाल्यानंतर मला यश मिळाले. लाबुशानेला बाद केले, तेही माझ्या दृष्टीने उत्तम होते. यामुळे माझे मनोबल उंचावण्यास बरीच मदत झाली’, असे सिराज तपशीलवार बोलताना म्हणाला.
या दौऱयादरम्यान सिराजच्या वडिलांचे निधन झाले आणि अंत्यविधीसाठी सिराज जाऊही शकला नव्हता. ‘येथील कामगिरी पाहिली असती तर वडिलांनाही आनंद झाला असता. मागील दोन महिने माझ्यासाठी कठीण स्वरुपाचे होते’, असे सिराज येथे काही आठवणींना उजाळा देताना म्हणाला.









