वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऍशेस कसोटी क्रिकेट मालिकेतील येथे येत्या रविवारपासून तिसऱया कसोटीला प्रारंभ होणार आहे. या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ घोषित करण्यात आला असून नवोदित वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडचा समावेश करण्यात आला आहे.
या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने जिंकून इंग्लंडवर 2-0 अशी आघाडी मिळविली आहे. ऍडलेडमध्ये झालेल्या दुसऱया कसोटीत हुकमी गोलंदाज स्टार्कला पाठदुखीची समस्या निर्माण झाल्याने तो तिसऱया कसोटीसाठी उपलब्ध राहील किंवा नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट निवड समितीने बोलँड या नव्या वेगवान गोलंदाजाला संघात स्थान दिले आहे. बोलँडने आतापर्यंत 14 वनडे आणि तीन टी-20 सामने खेळले आहेत. व्हिक्टोरिया संघातील तो प्रमुख गोलंदाज म्हणून ओळखला जातो. न्यू साऊथ वेल्स संघाविरूद्धच्या दोन सामन्यात बोलँडने 15 बळी मिळविले आहेत. दुखापतीच्या समस्येमुळे हॅजलवूडला या मालिकेतील पहिल्या कसोटीत खेळता आले नव्हते तर ऍडलेड कसोटीत कमिन्सचा समावेश नव्हता. आता मेलबर्नच्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात कमिन्स आणि हॅजलवूड यांचे पुनरागमन झाले असून ही कसोटी बॉक्सिंग डे दिवशी सुरू होईल.









