ऍशेस आपल्याकडेच कायम राखण्यात कांगारुंना यश, इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 68 धावांत खुर्दा
वृत्तसंस्था/ मेलबर्न
पदार्पणवीर स्कॉट बोलँडने अवघ्या 7 धावात 6 फलंदाज गारद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने तिसऱया कसोटी सामन्यात इंग्लंडचा 1 डाव व 14 धावांनी धुव्वा उडवला आणि ऍशेस आपल्याकडेच कायम राखण्यात यश प्राप्त केले. एमसीजीवरील या लढतीत बोलँडच्या भेदक माऱयामुळे इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 68 धावांमध्येच खुर्दा झाला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांच्या या मालिकेत 3-0 अशी एकतर्फी विजयी आघाडी घेतली.
मंगळवारी सामन्याच्या तिसऱया दिवशी 4 बाद 31 या मागील धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर इंग्लंडवर लवकरच सर्वबाद 68 धावांची नामुष्की आली. बेन स्टोक्स दिवसातील पाचव्या षटकात स्टार्कच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याला 11 धावा जमवता आल्या.
32 वर्षीय बोलँडने दिवसातील त्याच्या पहिल्या षटकात जॉनी बेअरस्टोला 5 धावांवर बाद करत इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. नंतर दुसऱया षटकात जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित जो रुटला (28) बाद केले. त्यानंतर तिसऱया षटकात मार्क वूड (0) व ऑलि रॉबिन्सन (0) यांनाही त्याने तंबूचा रस्ता दाखवला.
जेम्स अँडरसन (2) कॅमेरुन ग्रीनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला आणि इथेच इंग्लंडचा दुसरा डाव 27.4 षटकात 68 धावांमध्ये संपुष्टातही आला. सामन्यात 55 धावात 7 बळी, असे पृथक्करण नोंदवणाऱया बोलँडला सामनावीर पुरस्काराने गौरवले गेले. उभय संघातील चौथी कसोटी दि. 5 जानेवारीपासून सिडनीत खेळवली जाईल. त्यानंतर दि. 14 जानेवारीपासून खेळवल्या जाणाऱया पाचव्या कसोटीसह मालिकेची सांगता होईल.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद 185.
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः सर्वबाद 267.
इंग्लंड दुसरा डाव ः हसीब हमीद झे. कॅरे, गो. बोलँड 7 (31 चेंडूत 1 चौकार), झॅक क्रॉली झे. कॅरे, गो. स्टार्क 5 (16 चेंडूत 1 चौकार), डेव्हिड मलान पायचीत गो. स्टार्क 0 (1 चेंडू), जो रुट झे. वॉर्नर, गो. बोलँड 28 (101 चेंडूत 4 चौकार), जॅक लीच त्रि. गो. बोलँड 0 (2 चेंडू), बेन स्टोक्स त्रि. गो. स्टार्क 11 (16 चेंडूत 2 चौकार), जॉनी बेअरस्टो पायचीत गो. बोलँड 5 (18 चेंडू), जोस बटलर नाबाद 5 (14 चेंडूत 1 चौकार), मार्क वूड झे. व गो. बोलँड 0 (3 चेंडू), ऑलि रॉबिन्सन झे. लाबुशाने, गो. बोलँड 0 (2 चेंडू), जेम्स अँडरसन त्रि. गो. ग्रीन 2 (4 चेंडू). अवांतर 5. एकूण 27.4 षटकात सर्वबाद 68.
गडी बाद होण्याचा क्रम
1-7 (क्रॉली, 4.4), 2-7 (मलान, 4.5), 3-22 (हमीद, 10.3), 4-22 (लीच, 10.5), 5-46 (स्टोक्स, 16.5), 6-60 (बेअरस्टो, 22.5), 7-61 (रुट, 24.4), 8-65 (वूड, 26.1), 9-65 (रॉबिन्सन, 26.3), 10-68 (अँडरसन, 27.4).
गोलंदाजी
मिशेल स्टार्क 10-3-29-3, पॅट कमिन्स 10-4-19-0, स्कॉट बोलँड 4-1-7-6, कॅमेरुन ग्रीन 3.4-0-8-1.









