वृत्तसंस्था/ सिडनी
येथे मंगळवारपासून सुरू होणाऱया विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर-300 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून भारताच्या किदाम्बी श्रीकांतने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. आता या स्पर्धेत किदाम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन, सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी सहभागी होणार नाहीत.
या स्पर्धेसाठी एकूण 180,000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. समीर वर्मा आणि मिथुन मंजुनाथ भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. डिसेंबर महिन्यात होणाऱया विश्व टूर अंतिम बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होण्याकरिता श्रीकांतला ऑस्ट्रेलियातील ही स्पर्धा जिंकणे जरुरीचे होते. पण आता 29 वषीय श्रीकांतने या स्पर्धेतून माघार घेतल्याने त्याला वर्षअखेरीच्या विश्व टूर फायनल्स स्पर्धेत पहिल्या दहा बॅडमिंटनपटूंमध्ये प्रवेश करता येणार नाही. किदाम्बी श्रीकांतने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक तसेच थॉमस चषक स्पर्धेत भारताच्या जेतेपदामध्ये त्याचा सहभाग महत्त्वाचा ठरला होता. जर्मनीमध्ये नुकत्याच झालेल्या हायलो बॅडमिंटन स्पर्धेत त्याने उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती. 2022 च्या अखेरीस होणाऱया विश्व टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष विभागात भारताचा प्रणॉय हा एकमेव बॅडमिंटनपटू राहील.
भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने ऑस्टेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन स्पर्धेत आता समीर वर्मा तसेच मिथुन मंजुनाथ भारताचे प्रतिनिधित्व करतील. समीर वर्माचा सलामीचा सामना नाथन टेंगशी होणार आहे. महिलांच्या एकेरीमध्ये भारताची तानिया हेमंत तसेच अन्वेषा गौडा सहभागी होत आहेत. महिलांच्या दुहेरीत सिमरन सिंघी आणि ऋतिका ठक्कर तसेच पुरुष दुहेरीत ए. हरिहरन आणि रुबेन कुमार भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत.