रोहितसह पाच खेळाडूंना आयसोलेट केल्याचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा दावा
मेलबर्न / वृत्तसंस्था
उपकर्णधार रोहित शर्मा, उदयोन्मुख सलामीवीर शुभमन गिल, यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतसह 5 भारतीय खेळाडूंना कोव्हिड-19 चे प्रोटोकॉल तोडल्याप्रकरणी संघापासून वेगळे केले गेले असून त्यांची चौकशी केली जाणार आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केल्यानंतर एकच खळबळ उडाली. प्रारंभी, बीसीसीआयने याचा स्पष्ट इन्कार केला. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संयुक्त चौकशी सुरु असून पाच खेळाडूंना आयसोलेट केले असल्याचा पुनरुच्चार केला.
सदर पाच खेळाडूंनी एका चाहत्यासमवेत बाहेरील रेस्टॉरंटमध्ये जेवण घेतले. त्यानंतर त्या चाहत्याने ऋषभ पंतने आपल्याला अलिंगन दिले असल्याचे सोशल मीडियावर म्हटले होते. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली.
‘रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी हे पाच खेळाडू मेलबर्नमध्ये नववर्षाच्या स्वागताप्रसंगी मेलबर्नमधील एका रेस्टॉरंटमध्ये एका चाहत्यांसमवेत एकत्रित दिसून आले. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया व बीसीसीआयला त्याची सूचना दिली गेली आहे’, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ईमेलद्वारे नमूद केले.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरु असून त्यातील तिसरी लढत दि. 7 जानेवारी रोजी सिडनीत खेळवली जाणार आहे. दोन्ही संघ सध्या मेलबर्नमध्येच असून दि. 4 रोजी ते सिडनीकडे रवाना जाणे अपेक्षित आहे.
प्रोटोकॉलनुसार, खेळाडूंना बाहेरील रेस्टॉरंटमध्ये जाण्याची मुभा आहे. मात्र, ज्या ठिकाणी जाणार, तेथे प्रोटॉकॉल पाळले जाणे व खेळाडूंनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक असते.
‘बीसीसीआय व क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रकरणी चौकशी करत असून बाहेर जेवणे हा जैवसुरक्षा शिष्टाचाराचा भंग आहे का, याची माहिती घेतली जात आहे. आयसोलेशन प्रोटोकॉल वैद्यकीय पथकासमोर ठेवले गेले आहेत’, असा दावा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केला. सदर पाचही खेळाडूंना खबरदारीचा उपाय म्हणून आयसोलेट केले गेले आहे, असाही क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा दावा आहे.
एकीकडे, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 5 भारतीय खेळाडूंना आयसोलेट केले असल्याचा दावा केल्यानंतर दुसरीकडे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मात्र हे वृत्त स्पष्टपणे फेटाळून लावले आहे. भारतीय खेळाडू सदर रेस्टॉरंटमध्ये गेले होते. पण, त्याला ऑस्ट्रेलियन माध्यमांनी वेगळा रंग दिला असल्याचा दावा बीसीसीआयने केला. सदर 5 खेळाडूंना कोव्हिड-19 च्या प्रोटोकॉलची पूर्ण कल्पना आहे आणि यातील एकाही बाबीचा त्यांनी अजिबात भंग केलेला नाही, असे क्रिकेट नियामक मंडळातील एका वरिष्ठ सूत्राने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
नवलदीप सिंग नामक चाहत्याने 5 भारतीय क्रिकेटपटूंसमवेतचे छायाचित्र व काही व्हीडिओ पोस्ट केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. नवलदीपने ट्वीट केलेल्या छायाचित्रात रोहित शर्मा, ऋषभ पंत, नवदीप सैनी व शुभमन गिल दिसून आले.
या चाहत्याने आपण खेळाडूच्या अगदी समीप बसलो असल्याचा दावा केला. शिवाय, जेवण झाल्यानंतर ऋषभ पंतला अलिंगन दिल्याचाही दावा केला. मात्र, ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी याप्रकरणी राळ उठवल्यानंतर आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ते उचलून धरल्यानंतर सदर चाहत्याने यू टर्न घेतला आणि ऋषभ पंतने आपल्याला मिठी मारली नव्हती, आपण भावनेच्या भरात असे बोलून गेलो, असे स्पष्टीकरण दिले.
‘ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांमधील काही घटकांनी खोडसाळपणा केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. मात्र, आमच्या खेळाडूंकडून शिष्टाचाराचा भंग झालेला नाही, हे आम्ही स्पष्ट करु इच्छितो. दुसऱया कसोटी सामन्यात यजमान संघाला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर ऑस्ट्रेलियन माध्यमातील काही घटकांना असा खोडसाळपणा सूचत आहे’, असे बीसीसीआयने येथे नमूद केले.
भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेत ऍडलेडमधील पहिल्या सामन्यात भारताचा फडशा पडला. पण, मेलबर्नमधील दुसऱया कसोटी सामन्यात भारतीय संघाने जोरदार मुसंडी मारली आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली. ‘सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड’ या ऑस्ट्रेलियातील आघाडीच्या दैनिकाने क्रिकेट ऑस्ट्रेलिया किंवा बीसीसीआय यांच्यापैकी एकाही मंडळाची अधिकृत भूमिका छापली नाही. मात्र, मालिका सुरु असताना खेळाडूंनी रेस्टॉरंटला भूमिका देणे चुकीचे होते, असे आपल्या वृत्तात म्हटले आहे.
‘जगभर थैमान घालणाऱया कोरोनाचा खेळाडूंना धोका पोहोचू नये, यासाठी त्यांना शिष्टाचार घालून दिले जातात. अगदी ऑस्ट्रेलियातही कोरोनाचा बऱयाच ठिकाणी उद्रेक झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघातील 5 खेळाडू बाहेरील रेस्टॉरंटमध्ये आढळून आल्याने नव्या वादंगाला सुरुवात झाली आणि यामुळे सिडनीतील तिसऱया कसोटी सामन्याबाबतच अनिश्चितता निर्माण झाली आहे.









