वृत्तसंस्था/ मेलबोर्न
2022 च्या टेनिस हंगामातील जानेवारीत येथे होणाऱया पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत ब्रिटनचा माजी टॉपसिडेड टेनिसपटू अँडी मरेला पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे.
ब्रिटनच्या अँडी मरेने आतापर्यंत तेरावेळा या ग्रँडस्लॅम स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला असून तो आता चौदाव्यांदा या स्पर्धेत सहभागी होत आहे. या स्पर्धेत मरेने आतापर्यंत 48 सामने जिंकले असून तेरा सामने गमविले आहेत. त्याने या स्पर्धेत यापूर्वी पाचवेळा पुरुष एकेरीची अंतिमफेरी गाठली आहे. मात्र त्याला आतापर्यंत एकदाही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. 34 वर्षीय मरेने 2019 साली या स्पर्धेत आपला शेवटचा सहभाग दर्शविला होता. एटीपीच्या ताज्या क्रमवारीत मरे सध्या 134 व्या स्थानावर आहे. मरेने यापूर्वी दोनवेळा विंबल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली आहे. मध्यंतरी वारंवार दुखापतीमुळे मरेला टेनिस क्षेत्रापासून अलिप्त राहावे लागले होते.









