वृत्त संस्था/ दुबई
येथे 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया 13 व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱया ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना सहा दिवसांच्या कालावधीसाठी क्वारंटाईन सक्तीचे केले जाणार असल्याचे समजते. ऑस्ट्रेलियाचे सदर क्रिकेटपटू ब्रिटनमधून दुबईत येणार आहेत.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नाई सुपर किंग्जचे गोलंदाज प्रशिक्षक एरीक सिमॉन्स यांनी ही माहिती दिली आहे. राजस्थान रॉयल्स संघातील स्मिथ, सनरायजर्स हैद्राबाद संघातील डेव्हिड वॉर्नर आणि चेन्नाई सुपर किंग्ज संघातील हॅजलवूड हे तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू ब्रिटनमधून थेट संयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल होणार आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंड दौऱयावर असून उभय संघातील तिसरा आणि शेवटचा सामना येत्या बुधवारी झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे हे क्रिकेटपटू अबु धाबीकडे प्रयाण करणार आहेत. 17 सप्टेंबरला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू संयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल होणार असून त्यानंतर दोन दिवसांच्या अंतराने या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. चेन्नाईचा संघ संयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल झाल्यानंतर या संघाला कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. या संघातील दोन क्रिकेटपटूंसह अन्य एकूण 13 जणांना कोरोनाची लागण झाली होती.









