लाहोर / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिशेल मार्श पाकिस्तानविरुद्ध आगामी वनडे मालिकेपूर्वी दुखापतग्रस्त झाला असून यामुळे आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्स प्रँचायझीकडून खेळणार का, याबद्दलही साशंकता निर्माण झाली आहे. मार्शला दिल्लीने मेगा ऑक्शनमध्ये 6.5 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे.
पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, मार्श पाकिस्तानविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळल्यानंतर आयपीएल स्पर्धेत तो सहभागी होणे अपेक्षित होते. मात्र, आता झालेल्या दुखापतीमुळे त्याचा सहभाग धोक्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान यांच्यातील 3 वनडे सामन्यांची मालिका आजपासून (मंगळवार दि. 29) खेळवली जाणार असून त्यानंतर एकमेव टी-20 लढत 5 एप्रिल रोजी होणार आहे.
30 वर्षीय मिशेल मार्श मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक राहिला असून गतवर्षी टी-20 वर्ल्डकप जेत्या ऑस्ट्रेलियन संघात त्याचा समावेश होता. त्याने न्यूझीलंडविरुद्ध अंतिम लढतीत नाबाद 77 धावांची निर्णायक खेळी देखील साकारली होती. याशिवाय, गतवर्षी त्याने कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावांचा ऑस्ट्रेलियन विक्रम देखील मोडीत काढला. त्यावेळी मार्शने 36.88 च्या सरासरीने 627 धावांची आतषबाजी केली होती.









