महान फलंदाज, माजी भारतीय प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांचे प्रशंसोद्गार
ऍडलेड / वृत्तसंस्था
भारतीय कर्णधार विराट कोहली हा ऑस्ट्रेलियन नसलेला पण, ऑस्ट्रेलियन खेळाडूंप्रमाणे सर्वात शिस्तीचा, व्यावसायिक खेळाडू आहे, या निकषात तोच सर्वाधिक परिपूर्ण बिगर ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरतो, असे प्रतिपादन महान फलंदाज व भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक गेग चॅपेल यांनी केले. विराटने आपल्या आक्रमक शैलीसह भारतीय क्रिकेटला यशाच्या शिखरावर नेण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे, असे ते म्हणाले.
‘यापूर्वीचे भारतीय क्रिकेट संघ आपल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध फक्त बचावात्मक खेळावरच भर देत असत. एका अर्थाने ही भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अनुसरुन गांधीवादी विचारसरणी होती. हा दृष्टिकोन बदलणारा सौरभ गांगुली हा पहिला भारतीय कर्णधार ठरला. गांगुलीमुळे भारतीय क्रिकेट नव्या वळणावर आले. त्याला शिखरावर नेण्यात विराट कोहलीचा वाटा सिंहाचा राहिला’, असे चॅपेल यांनी सिडनी मॉर्निंग हेरॉल्डसाठी लिहिलेल्या स्तंभातून नमूद केले.
‘कसोटी क्रिकेट विराटसाठी नेहमीच विशेष पसंतीचे राहिले आहे आणि जागतिक स्तरावर भारताला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी तो सातत्याने प्रयत्नशील राहत आला आहे. भारतीय कर्णधार कसोटी क्रिकेटला महत्त्व देत असेल, त्यात आक्रमक खेळ साकारत असेल, फक्त विजयासाठीच खेळत असेल तर व्यवस्थापनासाठी देखील हे निश्चितच स्वागतार्ह असते. 2019 विश्वचषक स्पर्धेत ओव्हलवर स्टीव्ह स्मिथची हुर्यो उडवणाऱया प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन करत त्याने आपली खिलाडूवृत्ती दाखवून दिली होती’, असे चॅपेल या स्तंभात पुढे म्हणतात.
ऍडलेडमधील पहिली कसोटी संपन्न झाल्यानंतर विराट आपल्या पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी मायदेशी परतणार आहे. मात्र, त्याचा हा निर्णय रुचला नसल्याचे चॅपेल येथे म्हणाले. उर्वरित 3 लढतीत विराटची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवत राहील, असे त्यांनी नमूद केले. विराटची गुणवत्ता हेरणाऱया माजी प्रशिक्षक व प्रशिक्षक लालचंद रजपूत यांचा चॅपेलनी येथे विशेष उल्लेख केला.









