व्हिएन्ना
कोरोनाचा फैलाव जगभरातील सर्वच देशांमध्ये नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनच्या रुपात अक्षरशहा धुमाकूळ घालतो आहे. विविध देशांनी सध्या कोरोना प्रतिबंधक लसी देण्याच्या मोहिमेला पुन्हा नव्या जोमाने सुरूवात केली आहे. यात ऑस्ट्रियाने मात्र वेगळी चाल खेळण्याचा प्रयत्न केलाय. या देशाने लसीकरण करणाऱयांसाठी लॉटरी जिंकण्याची संधी आणली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे देशातील प्रमाण हे 72 टक्के इतके झाले आहे. पण गेल्या एक दोन दिवसात मात्र ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने सरकार आता सतर्क झाले असून याचाच एक भाग म्हणून पुन्हा लसीकरण प्रक्रियेला धार चढवण्याच्या मोहिमेला सुरूवात केली आहे. याअंतर्गत लसीकरण करण्यासाठी अधिकाधिक जण पुढे यावेत यासाठी सरकारने राष्ट्रीय स्तरावर लॉटरी पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येकी दहापैकी एकाला 500 युरोचे बक्षिस जिंकण्याची संधी असणार आहे. ऑस्ट्रियात लस घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी होतो, हे आगामी काळात कळणार आहे.









