ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित चित्रपटांनाही नामांकन
सॅन फ्रान्सिस्को / वृत्तसंस्था
कोरोना काळात देश आणि जगात सर्वकाही ठप्प राहिले असताना सर्व चित्रपटगृहे आणि मल्टीप्लेक्सही बंद राहिली आहेत. चित्रपटगृहांमध्ये अनेक चित्रपटांचे प्रदर्शन टाळण्यात आले. अशा स्थितीत ओटीटी (ओव्हर-द-टॉप) प्लॅटफॉर्म्सना मोठी पसंती मिळाली आहे. चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कारानेही ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी अटी शिथिल केल्या आहेत.
कोरोना महामारीमुळे पुरस्कार सोहळा यापूर्वीच दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. अशा स्थितीत हा सोहळा पुढील वर्षी 25 एप्रिल रोजी पार पडणार आहे. यात जानेवारी 2020 पासून फेब्रुवारी 2021 दरम्यान प्रदर्शित चित्रपटांना सामील केले जाणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक लाभ नेटफ्लिक्सला होण्याची अपेक्षा आहे. नेटफ्लिक्सचे सुमारे 22 चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत आहेत.
गॅरी ओल्डमन यांचा ‘मँक3Ÿ चित्रपट, जॉर्ज क्लूनी यांचा ‘द मिटनाइट स्काय’ आणि एमी ऍडम्स तसेच ग्लेन क्लोज यांचा ‘हिलबिली एल्गी’ या चित्रपटांना पुरस्कार मिळण्याची दाट शक्यता आहे. ऑस्कर 2020 मध्ये नेटफ्लिक्सने 24 नामांकने प्राप्त केली होती आणि 2 ऑस्कर पुरस्कार पटकाविले होते. अमेरिकेतील नियतकालिक वरायटीनुसार भारतातून आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या शेणीत मराठी चित्रपट ‘द डिसायपल’ला ऑस्करचे नामांकन मिळण्याची शक्यता आहे.









