ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात पारितोषिक वितरण सुरु असतानाच हॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते विल स्मिथ यांनी कार्यक्रमाचे होस्ट क्रिस रॉक यांच्या कानशिलात लगावली. रॉक याने विल स्मिथ यांच्या पत्नीवर जोक केल्याने स्मिथ यांचा पारा चढला. त्यामुळे त्यांनी मंचावर येऊन रॉक यांच्या कानशिलात लगावली.
सिनेसृष्टीत सर्वोच्च पुरस्कार समजल्या जाणाऱ्या 94 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरूवात झाली आहे. लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा सुरू आहे. रविवारी रात्री कार्यक्रमाचे होस्ट क्रिस रॉक सर्वोत्कृष्ट माहितीपट पुरस्काराची घोषणा करण्यासाठी रॉक मंचावर आले. तेव्हा त्यांनी विल स्मिथ यांची पत्नी जेडा पिंकेट स्मिथ यांची थट्टा केली. जेडने गेल्या वर्षी एलोपेशियाशी झुंज दिल्यानंतर मुंडण केले होते. यावरून रॉकने जोक मारला. पत्नीची चुकीच्या पद्धतीने झालेली ही थट्टा सहन न झाल्याने स्मिथ यांचा पारा चढला. त्यांनी मंचावर जाऊन रॉक यांच्या कानशिलात लगावली. दरम्यान, या घटनेनंतर सभागृहात मोठा गोंधळ उडाला होता..









