वृत्तसंस्था/ बर्मिंगहम
ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पथकाला सहभागी होण्यास आयोजकांनी परवानगी दिली आहे. भारतीय पथकातील काही खेळाडूंची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना प्रथम रोखण्यात आले होते. पण पुनर्चाचणीत ते निगेटिव्ह आल्याने त्यांना सहभागाची परवानगी देण्यात आली आहे. बीडब्ल्यूएफने या चाचणी घेतल्या होत्या.
भारतीय पथकातील तीन खेळाडू व साहाय्यक स्टाफमधील एकजण मंगळवारी घेतलेल्या चाचणीत पॉझिटिव्ह आले होते तर काही जणांचा अहवाल निश्चित झाला नव्हता. त्यामुळे अंतिम अहवालाची ते प्रतीक्षा करीत होते. या निर्णयामुळे त्यांना स्पर्धेच्या तयारीसाठी सरावही करता आला नव्हता. ‘पथकातील एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आलेला नाही. त्यामुळे आम्ही ऑल इंग्लंड स्पर्धेसाठी सज्ज आहोत,’ असे भारतीय संघाचे विदेशी प्रशिक्षक मथायस बोए यांनी इंस्टाग्रामवरील पोस्टमधून कळवले होते. बीडब्ल्यूएफ व बॅडमिंटन इंग्लंडनेही भारताला ईमेलद्वारे भारताचा एकही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह नसल्याचे कळविले. त्यामुळे ते या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात, असे त्यांनी पुढे म्हटले होते.
स्पर्धेला उशिराने सुरुवात
बुधवारपासून योनेक्स ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होणार होती. पण कोव्हिड 19 साठी घेण्यात आलेल्या बऱयाच जणांच्या चाचणींचा अहवाल अनिश्चित आल्याने ही स्पर्धा काही तास उशिराने सुरू करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला.
यासंदर्भात बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन व बॅडमिंटन इंग्लंड यांनी संयुक्तपणे पत्रक जारी केले होते. ‘स्पर्धेत सहभागी होणाऱया विविध संघांच्या कोव्हिड चाचणी घेण्यात आल्या असून अनेकांचा अहवाल ‘अनिर्णायक’ असा आलेला होता. त्यामुळे त्यांच्या नमुन्याची पुन्हा एकदा चाचणी घेतली गले. याशिवाय फक्त काहीजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून कन्फर्मेशनसाठी त्यांची पुन्हा एकदा चाचणी घेतली जाणार आहे. तोपर्यंत त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवले जाणार आहे. त्यामुळे स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजता सामन्यांना सुरुवात करण्यात आली,’ असे या निवेदनातून स्पष्ट केले होते. आधीच्या वेळापत्रकानुसार यातील सामने स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरू केले जाणार होते. गेल्या वर्षी ही स्पर्धा झाल्यानंतर कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या.
श्रीकांत,कश्यप पराभूत, अश्विनी-सिक्की रेड्डीची आगेकूच
भारताचे प्रमुख बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत व पारुपल्ली कश्यप यांना ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. मात्र महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी यांनी थायलंडच्या बेनयापा ऐमसार्द व नुन्ताकम ऐमसार्द या जोडीचा 30 मिनिटांच्या खेळात पराभव करून विजयी सलामी दिली. पुरुष एकेरीत आठवे मानांकन मिळालेल्या श्रीकांतला आयर्लंडच्या बिगरमानांकित एन्ग्युएन एन्हातकडून 11-21, 21-15, 12-21 असा पराभव स्वीकारावा लागला. हा सामना बरोबर एक तास चालला होता. आयर्लंडच्या खेळाडूने दुसरा गेम गमविल्यानंतर निर्णायक गेममध्ये जोरदार मुसंडी मारत श्रीकांतचे आव्हान संपुष्टात आणले. राष्ट्रकुल सुवर्णविजेत्या पी. कश्यपला जपानच्या अग्रमानांकित केन्टो मोमोटाकडून 13-21, 20-22 असा 42 मिनिटांच्या खेळात पराभव पत्करावा लागला.









