वृत्तसंस्था/ सोनीपत
प्स्तीपटू बजरंग पुनिया आणि रवी दहिया हे टोकियो ऑलिम्पिक खेळांतील दोन्ही पदकविजेते रविवारी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रतेच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. सदर आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीतील आपापल्या लढतीत पराभूत झाल्यामुळे त्यांच्यावर ही पाळी आली आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधातील आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या पुनियाला पुऊषांच्या फ्रीस्टाइल 65 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत रोहित कुमारविऊद्ध 1-9 असा पराभव पत्करावा लागला. त्यापूर्वी रविंदरविऊद्ध निसटता विजय मिळवण्यात तो यशस्वी झाला होता. जर रविंदरने एक गुण गमावला नसता, तर पुनिया त्या सलामीच्या लढतीतच बाद झाला असता.
पुनियाने त्यानंतर घाईघाईत भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) केंद्र सोडले. राष्ट्रीय उत्तेजकविरोधी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी डोप चाचणीसाठी पुनियाचा नमुना गोळा करण्याचा प्रयत्न केला, पण तिसऱ्या-चौथ्या क्रमांकासाठीच्या लढतीकरिताही तो थांबला नाही. पुनियाने ‘आयओए’च्या अस्थायी मंडळाद्वारे आयोजिण्यात आलेल्या चाचण्यांच्या तयारीसाठी रशियामध्ये प्रशिक्षण घेतले होते. निलंबित कुस्ती महासंघाला चाचण्या घेण्याचा अधिकार नसल्याचा दावा केल्यानंतर पुनियाने दिल्ली उच्च न्यायालयात खटला जिंकला होता.
नॉर्डिक पद्धतीने आयोजित केली जाणारी पुऊषांच्या 57 किलो वजनी गटातील स्पर्धा ही कठीणच होती. कारण टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता रवी दहिया आणि उभरता स्टार अमन सेहरावत हे दोघेही शर्यतीत होते. दुखापतीतून सावरून पुनरागमन करणाऱ्या दहियाला सलामीच्या लढतीतच अमनकडून 13-14 असा चुरशीच्या लढतीनंतर पराभव पत्करावा लागला. दोघेही छत्रसाल स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेतात.
2023 मध्ये दहिया स्पर्धेत उतरला नव्हता त्यावेळी जवळपास सर्व स्पर्धांमध्ये पदके जिंकून अमनने नाव कमावले होते. आशियाई क्रीडास्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या अमनने दहियाला शेवटच्या क्षणी धक्का देत ही लढत जिंकली. दहियाला पुढील लढतीत 20 वर्षांखालील आशियाई स्पर्धेतील विजेत्या उदितकडून पराभव पत्करावा लागल्याने तो शर्यतीतून बाहेर पडला.









