वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान जपानमध्ये होणाऱया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बॅडमिंटन या क्रीडा प्रकारातील पात्र फेरीच्या कालावधीत जवळपास दोन महिने वाढ केली आहे. कोरोना महामारी समस्येमुळे तीन महत्त्वाच्या स्पर्धा लांबणीवर टाकल्याने पात्र फेरीच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता 15 जून ही शेवटची तारीख असेल. यापूर्वी ऑलिम्पिक पात्रता बॅडमिंटन प्रकारातील कालावधी 25 एप्रिलअखेर जाहीर करण्यात आला होता.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पात्रता फेरीच्या कालावधीत आता 15 जून रोजी संपणार आहे. दरम्यान, सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील बॅडमिंटनपटूंच्या कामगिरीचा आढावा पात्र फेरीसाठी घेतला जाणार असून सिंगापूरमधील ही स्पर्धा शेवटची पात्रता फेरी स्पर्धा असेल. सदर माहिती विश्व बॅडमिंटन फेडरेशन आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या वरि÷ अधिकाऱयांनी दिली.
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र फेरीच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पुन्हा नव्याने खेळविल्या जाणार आहेत. योनेक्स स्वीस खुली बॅडमिंटन स्पर्धा 2 ते 7 मार्च, योनेक्स अखिल इंग्लंड खुली बॅडमिंटन स्पर्धा 17 ते 21 मार्च दरम्यान होणार आहे. सेलकॉम ऍक्झेटा मलेशिया खुली सुपर-750 दर्जाची बॅडमिंटन स्पर्धा आता 25 ते 30 मे दरम्यान घेतली जाणार आहे. पण मलेशिया मास्टर्स 2021 सुपर-500 बॅडमिंटन स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. सिंगापूर खुली सुपर-500 बॅडमिंटन स्पर्धा आता 1 ते 6 जून दरम्यान होणार असल्याची माहिती मलेशिया आणि सिंगापूर बॅडमिंटन संघटनेच्या प्रवक्त्याने दिली आहे.









