10 हजार स्पर्धक, तितकेच साहायक-स्वयंसेवक, लाखो चाहते!
विवेक कुलकर्णी
वाऱयाची दिशा उंच झाडांनाच लवकर समजत असते आणि सध्याची वाऱयाची दिशा हेच सांगते आहे की, यंदाचे ऑलिम्पिक भरवणे आव्हानात्मक व त्याही पेक्षा अशक्य कोटीतील आहे. सध्याच्या परिस्थितीत ऑलिम्पिक होऊ शकत नाही. झालेच तर मिनी ऑलिम्पिक होऊ शकेल. 205 देश, 10 हजारहून अधिक ऍथलिट आणि तितकाच साहायक पथक, प्रशिक्षक, स्वयंसेवक, लाखो चाहत्यांचा मेळा…हे सारे सध्याच्या परिस्थितीत निव्वळ कठीण, निव्वळ आव्हानात्मक आहे.
भारतात सध्या आपण सर्व जण कोरोनाच्या दुसऱया लाटेविरुद्ध लढतो आहोत आणि भारतापासून 5956 किलोमीटर्स दूर अंतरावर वसलेल्या जपानमध्ये जापनीज लोक दुसऱया-तिसऱया नव्हे चक्क चौथ्या लाटेविरुद्ध जीवाच्या आकांताने लढताहेत.
कोरोना विषाणूमुळे हतबल झालेल्या या देशाने यापूर्वीच आणीबाणी जाहीर केली आहे आणि तरीही काही पदाधिकाऱयांनी न जाणो का, या प्रतिकूल परिस्थितीतही ऑलिम्पिक घेण्याचे प्रयत्न सोडलेले नाहीत.
खरं तर आता जे प्रतिकूल वातावरण आहे, ते पाहता, ऑलिम्पिक होऊ शकत नाही, हे सत्य समजून-उमजून तशी रितसर घोषणा करणेच योग्य. पण, तसे केले जात नाही आणि यामागे सर्वात मोठे कारण आहे ते म्हणजे अर्थकारण!
यजमान देश कोणीही असो, आपल्या देशाला ऑलिम्पिकचे यजमानपद मिळाले आहे तर ते भव्य-दिव्य करुन दाखवण्याचा त्यांनी चंग बांधलेला असतो. बरं, ते यजमानपदही असे सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी देखील अनेक दिव्ये पार पाडावी लागतात.
ऑलिम्पिक आयोजन समितीला आपले दांडगे प्रस्ताव पाठवावे लागतात, सदस्य राष्ट्रांची मनधरणी करावी लागते आणि प्रत्यक्ष निवडणुकीत ऑलिम्पिक यजमानपदासाठी आपल्यालाच अधिक मते मिळतील, याची तजवीजही करावी लागते. तेव्हा कुठे ऑलिम्पिक यजमानपदाची लॉटरी लागते.
साधारणपणे, 12 वर्षांपूर्वीच ऑलिम्पिक कुठे होणार, हे निश्चित होते आणि त्यानंतरची 4 ते 6 वर्षे मोठमोठाली स्टेडियम्स भरवण्यातच खर्ची पडतात. ऑलिम्पिकची तयारी आदर्शवत सुरु आहे का, हे पाहण्यासाठी आयओसीचे (आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती) पथक सातत्याने व्हीजिटवर येत असते, त्यावेळी त्यांचे समाधान होणे, हा महत्त्वाचा टप्पा असतो आणि असे हजारो कोटी रुपये एका ऑलिम्पिकच्या उभारणीत लागलेले असतात.
मागील काही वर्षे जपानने देखील अशीच काढली आहेत. सर्वप्रथम यजमानपदाचा प्रस्ताव, मग, निवडणुकीची तयारी आणि त्यात बाजी मारल्यानंतर स्टेडियम्स उभारण्याची तयारी….यात काहीच बदल नव्हता.
यजमानपदाच्या शर्यतीत त्यांनी इस्तंबूल व माद्रिद यांच्यावर मात केली तर रोमने माघार घेतली. बाकू व दोहा यांचे प्रस्ताव स्वीकारले गेले नाहीत. यजमानपद मिळाल्यानंतर जपानने तयारीला सुरुवातही केली. इथवर सारे काही आलबेल होते. पण, डिसेंबर 2019 मध्ये कोरोना नावाचे अनपेक्षित, अस्मानी संकट जपानवरच नव्हे तर अवघ्या विश्वावर घोंघावले आणि त्यानंतर सारी जगरहाटीच जणू स्तब्ध झाली, ठप्प झाली!
जपानमधील शेवटचे ऑलिम्पिक 1964 मध्ये
जपानने यापूर्वी 1964 मध्ये शेवटचे ऑलिम्पिक भरवले होते आणि त्यावेळी ते ऑलिम्पिक दुसऱया महायुद्धानंतर जपानच्या जडणघडणीचे एक प्रतीक म्हणून ओळखले गेले. पण, यंदाची स्थिती अगदीच प्रतिकूल आहे. इतकी प्रतिकूल की, यंदा ऑलिम्पिक क्रीडाज्योत प्रज्वलित करण्याचा सोहळा थोडक्यात आटोपण्यात आला आणि या क्रीडाज्योतीचा जगभरातील प्रवासही स्थगित आहे. अगदी जपानमधील रस्त्यांवरुन देखील क्रीडाज्योत धावणार नाही, असे घोषित केले गेले आहे आणि एकंदरीत प्रवास ऑलिम्पिक बंदिस्त स्टेडियममध्ये घेण्याच्या दृष्टीने सुरु आहे.
बंदिस्त स्टेडियममध्ये मिनी ऑलिम्पिक घेणे, हा आयोजकांचा शेवटचा खटाटोप असेल. पण, त्यात तरी यश मिळणार का, याचे उत्तर भविष्यात दडलेले आहे.
ऑलिम्पिक रद्द करणार, लांबणीवर टाकणार की मिनी ऑलिम्पिक भरवणार?
या स्पर्धेच्या परंपरेप्रमाणे ऑलिम्पिक कोणतीही असो, ती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची (आयओसी) ‘एक्सक्लुजिव्ह प्रॉपर्टी’ असते आणि याबाबत सर्व अंतिम निर्णयही आयओसीनेच घ्यायचा असतो. टोकियोतील सध्याची स्थिती प्रतिकूल आहे, हे सर्वश्रुत आहे. पण, यापूर्वीच एक वर्ष लांबणीवर टाकलेल्या ऑलिम्पिकबाबत आयोजकांना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा करायची आहे आणि म्हणूनच त्यांनी ऑलिम्पिक रद्दची घोषणा करणे आतापर्यंत अगदी शिताफीने टाळले आहे.
यंदाची ऑलिम्पिक आताही होऊ शकते. पण, त्यासाठी कोरोनाचे लवकरात लवकर जगभरातून समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे आणि सध्याच्या घडीला तरी असा कोणताही चमत्कार होण्याची स्थिती दृष्टिक्षेपात नाही. त्यामुळे, आयोजक काही कालावधीनंतर ऑलिम्पिक रद्दची घोषणा करणार, की ऑलिम्पिक लांबणीवर टाकणार की जुजबी मलमपट्टी करुन मिनी ऑलिम्पिक भरवणार, याचे उत्तर येत्या काही दिवसात मिळेल.
जपानचे बहुतांशी नागरिक म्हणतात, नो ऑलिम्पिक प्लीज!
यंदाची ऑलिम्पिक पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे घेतली जावी का, यासाठी जपानमध्ये आतापर्यंत बरेच सर्व्हे झाले आहेत आणि अगदी अलीकडे, सोमवारी जाहीर झालेल्या एका अहवालाचा निष्कर्ष सांगतो, प्लीज, यंदा ऑलिम्पिक घेऊ नका!
अगदी दोन-एक आठवडय़ांपूर्वी जपानमध्ये मोठी निदर्शने झाले आणि त्यातील काहींनी तर अगदी रक्तरंजित फलके घेऊन आपला निषेध नोंदवला. सोमवारी जो अहवाल जाहीर झाला, त्यानुसार, ऑलिम्पिक रद्द करावे, असे 43 टक्के नागरिकांचे मत आहे तर ऑलिम्पिक लांबणीवर टाकले जावे, असे 40 टक्के नागरिकांना वाटते. मागील महिन्यात असाच सर्व्हे जपानमधील एका स्थानिक दैनिकाने घेतला होता, त्यावेळी ही टक्केवारी अनुक्रमे 35 व 34 अशी होती.
त्या खेळाडूंचाही विचार, जे 10 सेकंदाच्या स्पर्धेसाठी 4 वर्षे झटत असतात!
ऑलिम्पिकमधील काही इव्हेंटस् अगदीच छोटेखानी असतात, अगदी अवघ्या 9 ते 10 सेकंदात संपणारे देखील! याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे 100 मीटर्स महिला व पुरुष गटातील धावण्याची स्पर्धा! पुरुष गटात जमैकाचा युसेन बोल्ट हा या इव्हेंटमधील पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान महामानव. 100 मीटर्स धावण्याच्या या इव्हेंटमध्ये बोल्टच्या खात्यावर 9.98 सेकंदाचा विश्वविक्रम आहे. अर्थात, ही स्पर्धा त्याने 9.98 सेकंदात पूर्ण केली आहे. तर, अशा छोटय़ा-छोटय़ा इव्हेंटसाठी बोल्टसारखे स्पर्धक चार-चार वर्षे तयारी करत असतात. त्या तयारीवर अगदी अंतिम क्षणी पाणी फिरवायचे का, हा आयोजकांचा सवाल आहे आणि तो रास्तही आहे.
जपानमध्ये अवघे 4.6 टक्के लसीकरण, ही मुख्य चिंता!
जपानची लोकसंख्या 12 कोटी 61 लाख इतकी असून त्यात अवघ्या 4.6 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे आणि ही ऑलिम्पिक आयोजनातील आणखी एक मोठी अडचण आहे. जपानची स्थिती इतकी खराब आहे की, अगदी कोलंबिया, लॅटव्हिया व तुर्की या देशांमधील लसीकरणही यापेक्षा अधिक झालेले आहे.
रद्द होणारे केवळ तिसरे ऑलिम्पिक ठरणार का?
ऑलिम्पिक चळवळीच्या इतिहासात आजवर केवळ तीनच ऑलिम्पिक स्पर्धा रद्द झाल्या आहेत आणि त्या म्हणजे 1916, 1940 व 1944 मधील ऑलिम्पिक! 1916 ची ऑलिम्पिक पहिल्या महायुद्धामुळे तर 1940 व 1944 मधील ऑलिम्पिक दुसऱया महायुद्धामुळे रद्द करावी लागली होती. यंदाचे ऑलिम्पिक रद्द करावे लागले तर जणू याचा अर्थ असाच असेल की, कोरोना हे देखील एक महायुद्धच!
ऑलिम्पिक आणि काही अनुत्तरित प्रश्न…
@सध्या ज्या देशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे, त्या देशातून येण्यास जपानने बंदी लादली असून यात भारताचा देखील समावेश आहे. हीच परिस्थिती यापुढेही कायम राखल्यास अशा देशातून येण्याबाबत जपानचे धोरण काय असणार?
@10 हजार स्पर्धक, तितकेच साहायक पथकातील सदस्य, प्रशिक्षक जपानमध्ये दाखल झाल्यानंतर ऑलिम्पिक व्हिलेज गजबजून जाणे साहजिक. तेथे सोशल डिस्टन्सिंग कसे पाळणार?
@एखाद्या इव्हेंटदरम्यान जर एखादा स्पर्धक पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यास इव्हेंट पुढे ढकलणार की रद्द करणार?
@ऑलिम्पिकसाठी 14 दिवस सक्त क्वारन्टाईनची अट तूर्तास मागे घेतली गेली आहे. पण, आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान संसर्गाची सर्वाधिक शक्यता असल्याने 10 हजार स्पर्धक व तितकाच लवाजमा दाखल होत असताना हा धोका कसा टाळणार?
@ऑलिम्पिकसाठी विदेशी पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही, असे आयोजकांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पर्यटकांना प्रवेश देताना काय निकष लावणार?
@बरेच ऑलिम्पिक इव्हेंट सांघिक गटातील असतात. अशा गटात एखाद्या संघातील दोन किंवा त्याहून अधिक स्पर्धक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्यास त्यावर काय निर्णय घेणार? सर्व संघांची पुन्हा चाचणी घेणार की तो इव्हेंटच रद्द करणार?
@सरतेशेवटी सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ऑलिम्पिक पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे घेणार? त्याऐवजी मिनी ऑलिम्पिक भरवणार? याऐवजी ती लांबणीवर टाकणार की सरसकट रद्द करणार?









