वृत्तसंस्था/ जिनिव्हा
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे (आयओसी) विद्यमान अध्यक्ष थॉमस बॅच यांनी शुक्रवारी ऑलिंपिक बहिष्कार विरोधात इशारा दिला असून पुढीलवर्षी होणाऱया आयओसीच्या निवडणुकीत आपण अध्यक्षपदासाठी फेर निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची निवडणूक प्रत्येक चार वर्षांनी घेतली जाते आता 2021 साली ही निवडणूक होणार आहे. विद्यमान अध्यक्ष थॉमस बॅच यांनी आतापर्यंत सलग दोनवेळा आयओसीचे अध्यक्षपदाची धुरा सांभाळली असून आता ते तिसऱयांदा अध्यक्षपदासाठी इच्छूक आहेत. आयओसीच्या नेतृत्वाच्या आठ वर्षांच्या कालावधीला 2013 पासून प्रारंभ झाला. आयओसीच्या सुमारे 100 सदस्यांपैकी निम्या सदस्यांनी बॅच यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीचे कौतुक केले आहे. आयओसीच्या सदस्यांची झालेल्या वार्षिक बैठकीमध्ये बॅच यांनी ऑलिंपिक स्पर्धेच्या वाटचालीची माहिती दिली. सदर बैठक ऑनलाईन घेण्यात आली होती.
बॅच यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या चार वर्षांच्या टप्प्यामध्ये रशियातील उत्तेजक प्रकरण चांगलेच वादग्रस्त ठरले होते. आयओसीची आर्थिक स्थिती स्थिर आणि भक्कम करण्यामध्ये बॅच यांनी बरेच परिश्रम घेतले. अमेरिकेच्या एनबीसी या प्रसारण वाहिनीबरोबर दीर्घ मुदतीचा आयओसीने करार केला होता. त्याचप्रमाणे आयओसीला नवा टॉप टियर पुरस्कर्ता मिळाला. या सर्व घटना बॅच यांच्या पहिल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत घडल्या होत्या.
कोरोना महामारी संकटामुळे चालू वर्षांतील टोकियो ऑलिंपिक स्पर्धा एक वर्षांसाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. आताही स्पर्धा 2021 च्या जुलै-ऑगस्ट दरम्यान भरविली जाईल. 2022 च्या फेब्रुवारीतील बिजिंग हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा ही बॅच यांच्या दुसऱया टप्प्यातील अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील सत्वपरिक्षा ठरणार आहे. आयओसीच्या सध्याच्या नियमावलीबाबत बॅच यांची अध्यक्षपदाच्या दुसऱया टप्यातील कारकीर्द महत्त्वाची ठरणार आहे. ऑलिंपिकवर बहिष्कार घालण्याची चर्चा काही देशामध्ये ऐकू येते. तसेच चीनच्या मानवी अधिकार संदर्भात आगामी ऑलिंपिकवेळी काही देशांकडून विरोध अपेक्षित असल्याने बॅच यांच्या निर्णयाकडे सर्व सदस्यांचे लक्ष राहील.
जागतिक एकात्मता याचे प्रतिक म्हणजे ऑलिंपिक पण सध्याच्या परिस्थितीत बऱयाच राष्ट्रांकडून चीनला विरोध दर्शविला जाण्याची शक्यता असून राजकीय हस्तक्षेप मोठय़ा प्रमाणात होवू शकेल. त्यामुळे ऑलिंपिक समितीला मोठय़ा समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. शुक्रवारी झालेल्या आयओसीच्या बैठकीमध्ये पाच नव्या सदस्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये विश्व ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष तसेच ब्रिटनचे ऑलिंपिक चॅम्पियन सेबेस्टियन को यांचा समावेश आहे. क्युबाच्या मारिया कोलॉन, अमेरिकेतील सौदी अरेबियाचे राजदूत प्रिन्सेस रीमा बदार अल सौदी, क्रोएशियाचे कीटारोव्हिक आणि मंगोलियाचे बॅटबोल्ड यांचीही निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचे जॉन कोट्स आणि सिंगापूरचे सेर मियांग नेगी यांना उपाध्यक्ष म्हणून बढती देण्यात आली आहे.









