केंद्रीयमंत्री किरेन रिजिजू : साई स्पोर्ट्स सेंटरमधील वसतिगृहाच्या कोनशिला कार्यक्रमात सहभागी
प्रतिनिधी / बेंगळूर
देशात सर्व क्रीडा केंद्रांमध्ये तारांकित हॉटेल्सप्रमाणे सुविधा असाव्यात, या उद्देशाने आपण प्रयत्नशील आहे. क्रीडा क्षेत्रात भारताने आणखी प्रगती करावी. 2028 च्या अमेरिकेतील लॉस एंजिल्स ऑलिंपिकमध्ये भारताचे टॉप 10 यादीत स्थान असावे. त्याकरिता आतापासूनच तयारी करावी, अशी हाक केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.
बेंगळूरमधील साई स्पोर्ट्स सेंटरमध्ये 330 बेड क्षमतेच्या क्रीडा वसतिगृहाचे आणि सिंथेटीक ट्रक निर्माण करण्यासाठी कोनशिला बसविल्यानंतर ते बोलत होते. साई स्पोर्ट्स सेंटरमध्ये स्वच्छता आणि सुंदरता महत्त्वाची आहे. खेळांना महत्त्व देणे आपले कर्तव्य आहे. क्रीडापटू आपल्या देशाची संपत्ती आणि अभिमान आहेत. देशभरात अनेक क्रीडा केंदे आहेत. पण काही ठिकाणी पुरेशी गुणवत्ता नाही. सर्व क्रीडा केंद्रे जागतिक दर्जाच्या केंद्रांपेक्षा कमी असू नयेत. सर्व पायाभूत सुविधा दर्जेदारच असल्या पाहिजेत. तेथे थ्रीस्टार हॉटेलसारख्या सुविधा असाव्यात. प्रोफेशनल मॅनेजमेंट असावे. त्याकरिता निविदा मागवून मॅनेजमेंट व्यवस्था करण्यात येईल, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.
क्रीडापटूंना ज्या पद्धतीचा आहार आवश्यक आहे ते पुरविण्याची व्यवस्था असावी. परंतु, या बाबतीत आपण म्हणव्या तितक्या वेगाने प्रगती साध्य केलेली नाही. साई क्रीडा केंद्रामध्ये विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यात येते. प्रामुख्याने ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱया क्रीडापटूंसाठी जागतिक दर्जाचे प्रशिक्षक नेमण्याची आपली तयारी आहे. भारतीय क्रीडा प्रशिक्षकच जागतिक दर्जाचे निर्माण व्हावेत. विदेशी प्रशिक्षकांपेक्षा भारतीय प्रशिक्षकांना उत्तम वेतन देण्यात येईल. आजचे उत्कृष्ट खेळाडू भविष्यात प्रशिक्षक बनावेत, अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पुढील चार महिने क्रीडापटूंना टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याची संधी आहे. क्रीडापटूंना आवश्यक सुविधा देण्यासाठी तांत्रिक पथक तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.









