शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांचा आरोपः आरोग्य विभागाचे वेधले लक्ष
वार्ताहर / वैभववाडी:
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी येथील अर्जुन रावराणे विद्यालयात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र, या लसीकरण केंद्रावर शहरातील काही लोक आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांना हाताशी धरून ‘वशिलेबाजी’ने आपल्या मर्जीतील लोकांना ऑफलाईन लसीकरणाची नोंदणी देत आहेत. याचा फटका लसीकरणासाठी केंद्रावर पहाटे चार वाजल्यापासून रांगेत उभ्या राहणाऱया लोकांना बसत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी लसीकरण मोहीम पारदर्शक राबवावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके व शिष्टमंडळाने तालुका आरोग्य अधिकाऱयाकडे केली आहे.
येथील अर्जुन रावराणे विद्यालयात गेले दोन महिने कोविड- 19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे लसीकरण केंद्रावर अनेकवेळा भांडण-तंटे झाल्याचे प्रकार घडले आहेत. आरोग्य विभागाच्या या कारभाराबाबत जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी यांचे लक्ष वेधण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन प्रत्येक लसीकरण केंद्रावर लसीकरण मोहिमेत बदल केला होता. दरम्यान, लसीकरणासाठी तालुक्मयातील ग्रामीण भागातील ज्ये÷ नागरिक मोठय़ा प्रमाणात येत आहेत. मात्र, अर्जुन रावराणे विद्यालयातील लसीकरण केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱयांना हाताशी धरून काही लोक ‘वशिलेबाजी’ करून आपल्या मर्जीतील लोकांना लसीकरणासाठी नोंदणी देत आहेत. हा प्रकार चुकीचा असून लसीकरणाचे योग्य नियोजन करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचे प्राधान्याने लसीकरण होण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे लोके यांनी निवेदनात म्हटले आहे.
लसीकरणाची ‘ऑनलाईन’ची यादी केंद्राबाहेर लावावी!
ज्या ग्रामस्थांनी लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे, अशा ग्रामस्थांची यादी केंद्राबाहेर सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करावी. नंबरप्रमाणे लसीकरणाचा लाभ द्यावा. लसीकरण मोहिमेत पारदर्शकता आणून लाभ मिळवून द्यावा. कोणावरही अन्याय होता कामा नये, अशी मागणी वाभवे वैभववाडीचे माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे यांनी तालुका आरोग्य अधिकारी अनिल पवार यांच्याकडे केली आहे.









