सातारा / गौरी आवळे
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात ऑनलाईन शिक्षणाकडे पर्याय म्हणून पाहण्याची गरज आहे. या नव्या शिक्षण प्रणालीमुळे मुलांचे आरोग्य धोक्यात येत आहे. सतत मोबाईलच्या संपर्कात येऊन मुले एकलकोंडी बनत आहेत. तसेच सायबर गुह्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे.
लॉकडाऊनच्या काळात मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, ते सुरू रहावे यासाठी ऑनलाईन शिक्षणाचे सर्वत्रीकरण होऊ लागले आहे. त्यासाठी शिक्षण संस्थांना काही मार्गदर्शक सूचना ही निर्देशित केल्या आहेत. मात्र या शिक्षणांमुळे मानसिक व शारीरिक आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. ऑनलाईन शिक्षणांच्या नावाखाली मुले मोबाईलकडे आकर्षित होत आहेत. तास न् तास मुले मोबाईलवर वेळ घालवत आहेत. यातून सायबर गुह्यांचे वाढते प्रमाण, मुलांचा छळ अशा घटना मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात.
शाळांमध्ये सामाजिक बंध, संवाद निर्माण होत असतो. मात्र ऑनलाईनच्या सततच्या सहवासामुळे मुले एकलकोंडी बनू लागल्याची भीती पालकांमधून व्यक्त होत आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. ते पालक मुलांना ऑनलाईन शिक्षण सहज उपलब्ध करून देत आहेत. गरीब, गरजु पालकांपुढे अद्याप प्रश्न चिन्ह उभे आहे. कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीत आणखी काही महिने शाळा सुरू होणार नाहीत. या काळात ऑनलाईन शिक्षणाला पर्याय नाही. मर्यादित कालावधीत ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन केले तर अनेक दुष्परिणाम टाळता येतील अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे.
मुलांवर वेळेचे बंधन घाला…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण हा एकच पर्याय आहे. मात्र, यामुळे मुलांच्या आरोग्यवर होणारे परिणाम टाळण्यासाठी पालकांनी वेळेचे बंधन घालणे गरजेचे आहे. मोबाईल शिवाय, टिव्ही, लॅपटॉप यांचा वापर कमी केला पाहिजे. सकारात्मक आरोग्यासाठी योग्य आहार वेळेवर देणे, व्यायाम वेळेवर करणे, प्राणायम सारखे प्रकार मुलांना शिकवणे. यामुळे मुलांच्या मानसिकतेवरील ताण कमी होण्यास मदत मिळते. – डॉ. अभिजीत घोरपडे, मनोवेध क्लिनिक सातारा
Previous Articleसातारा : पाटण ग्रामीण रुग्णालयाला ठोकले टाळे
Next Article सातारा : अन्यथा पालिकेसमोर आंदोलन छेडू









