ऑनलाईन शिक्षण वाईट आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पण त्याच्या काही मर्यादा आहेत हेही आपण समजून घ्यायला हवे. ते समजून घेतले नाही, तर आपण काळाच्याच मागून धावतो आहोत आणि काळाच्या प्रगतीतही काही फोलपणा असतो हेही लक्षात येणार नाही.
काळाबरोबर होत असलेले बदल स्वीकारण्याची मानसिकता आपल्याला ठेवावी लागते. मात्र, जे बदल होतात, ते एकूण समाजरचनेच्या सद्यस्थितीला किती पूरक ठरतात, याचाही विचार अग्रक्रमाने करावा लागतो. सध्या कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिक्षण दिले जात असून ते विद्यार्थ्यांना तारक की मारक अशी मतमतांतरे व्यक्त होत असताना अलीकडेच या विषयावर साहित्यिकांच्या ऑनलाईन झालेल्या चर्चासत्रात ऑनलाईन शिक्षण हे पारंपरिक शिक्षणाला पर्याय होऊ शकत नाही, असा समूह स्वर उमटला. हा स्वर प्रातिनिधिक असून त्यातून बऱयाच गोष्टी सूचित होत आहेत. प्रामुख्याने ऑनलाईन शिक्षणातून विद्यार्थी सामाजिकदृष्टय़ा समृद्ध होऊ शकत नाही. तो भवतालापासून दूर राहिल्यामुळे तो व्यक्तीकेंद्री राहण्याची शक्यता अधिक राहील.
शिक्षणाचा खरा अर्थ हा तुमचा सर्वांगीण विकास हाच आहे. सर्वांगीण विकासातूनच व्यक्तिमत्त्व विकास आकार घेत असतो. पण आपल्याकडे बहुसंख्य पालकांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होत नसल्याने मुलांना ज्ञानार्थी न बनविता, पालकांना मुलांची गुणांची टक्केवारी महत्त्वाची वाटत राहते. अशा लोकांना कदाचित ऑनलाईन शिक्षण महत्त्वाचे वाटेलही पण ज्यांच्याकडे ऑनलाईन शिक्षणाची सुविधाच नाही, ज्यांच्याकडे ऑनलाईन शिक्षणाची सुविधा असूनही मुलांच्या गुणांच्या टक्केवारीपेक्षा त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास महत्त्वाचा वाटतो आहे त्यांना ऑनलाईन शिक्षण हा पारंपरिक शिक्षणाचा पर्याय वाटत नाही. या अनुषंगाने साहित्यिकांच्या झालेल्या चर्चेचा आपल्याला विचार करता येईल. कथाकार वैभव साटम यांच्या मते, शिक्षकाचा वर्गातला वावर हा केवळ शारीरिकदृष्टय़ा उपस्थित नसतो, तर त्याचा वावर हा मुलांच्या मनात झालेला असतो. काळाच्या ओघात नवनवीन शैक्षणिक उपकरणे आली, नवीन तंत्रज्ञान आले. नवीन दृकमश्राव्य पद्धतीचे शिक्षण आले पण आजही एखादी गोष्ट शिक्षकांनी शिकविल्याशिवाय किंवा तिचा उलगडा शिक्षकाने केल्याशिवाय ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. याचा अर्थ एखादे यंत्र मुलांच्या भावनिक विश्वासापर्यंत पोचलेले नसते. यांत्रिक दिलेले शिक्षण हे त्याचा बुद्धय़ांक वाढवेल. पण शिक्षणाचा खरा हेतू जो आहे, तो मुलाचा सर्वांगीण विकास, ऑनलाईन शिक्षणातून अशा प्रकारचा सामाजिक, भावनिक विकास होणार का हा प्रश्न आहे. ऍड. विलास परब म्हणतात, आताच्या परिस्थितीत एक समस्या भेडसावते, ती ही की राईट ऑफ एज्युकेशन या कायद्यानुसार शिक्षण घेण्याचा मुलांना हक्क आहे. मात्र, दुसऱया बाजूला ऑनलाईन शिक्षण घ्यावे, असा मुलांना आग्रह धरणे कितपत शक्मय होणार आहे. ग्रामीण पातळीवरील, कष्टकरी कुटुंबातील मुलांना अशी साधने उपलब्ध होणे जिकरीचे आहे. शासन यावरही काहीतरी तोडगा काढेलच. मात्र, शल्य एक राहील, की समोर शिक्षक असण्याची जी काही भावना असते, ती तंत्रज्ञानाने कायमची बाजूला पडू नये. ऍड. परब यांच्या मुद्याला जोडून ऍड. मेघना सावंत म्हणतात, पुस्तकी ज्ञानाबरोबर मुलांना सामाजिक भान व संस्कारांची जाण यांची शिदोरीही आवश्यक असते, ती ऑनलाईन शिक्षणातून प्राप्त होईल का? ऑनलाईन वर्ग घेणाऱया अच्युत देसाई यांच्या मते, ऑनलाईन शिकवताना सुद्धा समोरून कोणी प्रश्न विचारला, तर उत्तर द्यावे लागते पण त्या उत्तराने इतरांचा वेळ वाया जाऊ नये हे पण बघावे लागते. ऑनलाईन मीटिंगमध्ये कितीही व्यक्ती सहभागी असल्या, तरी बहुतेकजणांचा व्हीडिओ ऑफ केलेला असतो. समोर माणूस व्हीडिओ सुरू ठेवून तिथे बसला आहे, की कुठे गेला आहे, शांतपणे फक्त ऐकतो आहे, की कुटुंबीयांची व आपलीही दिशाभूल करतो आहे हे समजायला काहीच मार्ग नसतो. त्याच्या चेहऱयावरचे प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह वाचायची गोष्ट तर खूपच लांब! यात समोरचा विद्यार्थी नेमका कुठे बसला आहे? घरात बसला आहे, रस्त्यावर बसला आहे, बागेत बसला आहे, की आणि कोणत्या सार्वजनिक ठिकाणी बसला आहे हे पण कळत नसते. त्याचप्रकारे तिथला सगळा कोलाहलसुद्धा आपल्याला नाईलाजाने ऐकावा लागतो. वारंवार आवाज बंद करायला सांगावे लागते. थोडक्मयात, काय तर ऑनलाईन शिक्षण ही तात्पुरती सोय आहे. अगदीच निरुपयोगी नाही, तर ती शिक्षणाला थोडीफार पूरक आहे. कवयित्री सरिता पवार म्हणतात, मुळात शिक्षण ही एक आंतरक्रिया असते. ज्यात शिक्षक व विद्यार्थी दोघांनीही थेट संवादी असणे गरजेचे असते. शिक्षकांसमोर जीताजागता संवेदनशील, उत्सुक जीव असतो. जो अभ्यासापलीकडे जाऊन भावनिकरित्या शिक्षकांशी जोडलेला असतो. त्याचा अभ्यास केवळ त्या नेमून दिलेल्या ज्ञानापुरता मर्यादित नसतो. त्या अभ्यासाला तो राहत असलेल्या परिसराचे, परिसरातील लोकांच्या जीवनमानाचे, संस्कृतीचे अनेक आयाम असतात. ज्याची सांगड घालून शिक्षकाला तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना समजेल, अशा ज्ञानात परिवर्तित करावा लागतो. त्यामुळे तंत्रज्ञान कितीही पुढे गेले, तरी शिक्षण ही प्रक्रिया यंत्राद्वारे कधीही यशस्वी होणार
नाही.
या चर्चासत्रात सहभागी झालेल्या प्रा. नीलम यादव, मधुकर मातोंडकर, अब्दुल मुल्ला, कवी सिद्धार्थ तांबे, प्रा. कौलापुरे आदींच्या विचारांचाही हाच सूर होता. मात्र, ऑनलाईन शिक्षण वाईट आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पण त्याच्या काही मर्यादा आहेत हेही आपण समजून घ्यायला हवे. ते समजून घेतले नाही, तर आपण काळाच्याच मागून धावतो आहोत आणि काळाच्या प्रगतीतही काही फोलपणा असतो हेही लक्षात येणार नाही. खरेतर शिक्षणातून माणूस अधिकाधिक संवेदनशील बनत असतो. या संवेदनशीलतेला बाधा येणारे शिक्षण दिले जात असेल, तर ते काय कामाचे?
अजय कांडर








