जगभरातील शैक्षणिक संस्थांनी कोरोनाच्या भीतीपोटी आपली कवाडे बंद केली असून दीड अब्जाहून अधिक विद्यार्थी आज घरात अडकून आहेत. थोडक्मयात कोरोनाने जगभरातील विद्यार्थ्यांची अभ्यासाची पद्धतच बदलून टाकली असे म्हणता येईल. आपल्या भारतातच घरात बंदिस्त असलेल्यांची संख्या 300 दशलक्ष एवढी मोठी ठरावी.
कोरोना लॉकडाऊनमुळे जगभर आर्थिक व्यवस्था जरी थंडावली असली तरीही ऑनलाईन शिक्षण, शैक्षणिक, तंत्रज्ञान, इंटरनेट व्यवस्था यांची मागणी मात्र वाढतच आहे. एकीकडे शैक्षणिक संस्था बंद असून दुसरीकडे शिक्षकवर्ग घरात बसल्या बसल्या ऑनलाईन वर्ग घेत असून, शैक्षणिक तंत्रज्ञान कंपन्या बंद पडलेल्या शैक्षणिक वर्गांची भरपाई करण्यासाठी विनामूल्य वर्ग उपलब्ध करत आहेत.
कोरोनाच्या धामाधुमीत विद्यार्थ्यांनी कसे शिकावे व शिक्षकांनी कसे शिकवावे याबाबत नवे वास्तूपाठ आपोआप घडले आहेत. पारंपरिक वर्गखोल्यांची जागा आता ऑनलाईन शिक्षक व आभासी वर्गानी घेतली आहे. ‘झूम, हँगआऊट, स्काईप, लाईव्ह चॅट, जी चॅट, आणि परस्पर संवादी वर्ग अशा नव्या शब्दांची घराघरात रेलचेल सुरू आहे. शैक्षणिक धडे वैयक्तिककृत स्वरूपात सामायिक केले जात आहेत आणि असे वर्ग सामान्य वर्ग सत्रांपेक्षा बरेच आकर्षक आणि परस्पर संवादी ठरत आहेत.
दरदिवशी शाळासमूह आणि या क्षेत्रातील अधिकारी वर्गांकडून व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्यासाठी आणि दुरस्थपणे ई-शिक्षणाचे धडे देण्यासंबंधी नवनवे प्रस्ताव येत आहेत. पण दूरस्थ शिक्षणासाठी वर्गातील अध्यापनाच्या तुलनेत एका वेगळय़ा प्रकारच्या कौशल्यसंचांची गरज असते या सत्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. दुर्दैवाने आजपर्यंत कोणीही ‘ऑनलाईन’ पद्धतीने शिक्षण कसे द्यायचे याविषयी शिक्षकांना शिकवायची तसदी कुणीही घेतली नव्हती किंवा विद्यार्थ्यांनाही त्याबाबत मार्गदर्शन दिले गेले नव्हते. आता अचानकपणे ऑनलाईन शिक्षण कशाप्रकारे शिरावर घ्यायचे याविषयी शिक्षक व विद्यार्थी दोन्ही अनभिज्ञ आहेत, म्हणूनच एका नव्या गोंधळाची भर पडली आहे.
बरे ऑनलाईन शिक्षण देणे-घेणे तेवढे सोपेही नाही कारण इतर सार्वत्रिक अडचणी आहेत. केंद्रीय विद्यापीठ हैद्राबादने ऑनलाईन वर्गांविषयी केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे 90 टक्के शिक्षक व विद्यार्थ्यांकडे मोबाईल असून 63 टक्के लोकांना ऑनलाईन वर्गांबाबत माहिती होती. ऑनलाईन वर्गांबाबत उद्भवलेल्या चिंतांपैकी 40 टक्के लोकांना इंटरनेट सेवा अनुपलब्ध असल्याचे कारण सांगितले आहे. उर्वरित 30 टक्के लोकांनी इंटरनेट डेटाच्या किमतीचे कारण नमूद केले असून 10 टक्के लोकांनी अनिश्चित वीजपुरवठा हे ऑनलाईन वर्ग न घेण्याचे कारण दिले आहे.
ऑनलाईन शिक्षण देण्या-घेण्यात पायाभूत सुविधांशिवाय इतरही अडचणी आहेत. शिक्षकगणांना ऑनलाईन संसाधने वापरण्याचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण कधीही दिले गेले नसल्यामुळे ते असे शिक्षण देण्यासाठी लागत असलेल्या तांत्रिक, भावनिक सामर्थ्यांसाठी त्यांच्या ‘मुलां’वर अवलंबून रहावे लागते. ऑनलाईन शिक्षण देताना कॅमेरा योग्य स्थितीत ठेवणे, प्रकाश परिस्थिती सुनिश्चित करणे, वर्ग घेताना पार्श्वभूमीवर कोणतीही अनावश्यक हालचाल होत नाही याची काळजी घेताना विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित न होण्यासाठी अडथळे टाळणे उचित आहे. खराब इंटरनेट बँडविथ बरोबरच ऑनलाईन समस्यांना तोंड देण्यासाठी व सयुक्तिक वर्ग प्रभावीपणे शिकविण्यासाठी थोडे ‘व्हीडिओ शिष्टाचार’ पाळणे महत्त्वाचे ठरते. कॅमेऱयासमोर बोलताना, शिकवताना आपण फक्त कॅमेऱयासमोर नव्हे तर विद्यार्थ्यांना शिकवतो आहोत याचे भान असावे. यासाठी शिकविण्याची पद्धत वेगळी हवी. विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊ न देता प्रभावीपणे विषय मांडणी करून योग्य शैली राखण्याची आवश्यकता आहे. ऑनलाईन आशयाच्या वितरणासाठी स्वयंप्रेरणा, योग्य तयारी, शिस्त, वेळेचे भान ठेवत वैयक्तिककृत साधने वापरून शिक्षण मनोरंजक न केल्यास तो वर्गही अर्थपूर्ण ठरणार नाही.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे साधलेला प्रत्यक्ष व वैयक्तिक संवाद, शिक्षकांचे विद्यार्थ्यांप्रती ममत्व, वात्सल्य व प्रेम याला ऑनलाईन शिक्षण अपवाद ठरू शकत नाही. किंबहुना थेट वर्गशिक्षणाला ऑनलाईन शिक्षण पर्याय असू शकत नाही. पण या तंत्रज्ञानाच्या जगतात ऑनलाईन शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांना आकर्षण आहे हे विसरून चालणार नाही. आज मुले आयुष्यात पहिल्यांदाच ऑनलाईन शिक्षणाचा अनुभव घेत आहेत. शिक्षकांवर ही जबाबदारी पहिल्यांदाच आली असली तरी यापुढे ऑनलाईन शिक्षण दैनंदिन शिकवण्यांचा अविभाज्य भाग बनणार आहे हे तर निश्चित. विशेषतः शिक्षकांनी या नव्या माध्यमाबाबत सरावात राहणे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, कॅमेऱयाद्वारे का असेना पण वैयक्तिक संपर्क, वैयक्तिक लक्ष, आनंद, कळकळ व संवाद सुनिश्चित करण्यासाठी कसलेही प्रयत्न अपूर्ण राहता कामा नयेत. याबाबत जागरूक असावे. ऑनलाईन शिक्षण घेताना विद्यार्थी नियमितपणा राखत आहेत काय याबाबत जागरूकता व आवश्यक पाठपुरावा करणे गरजेचे आहे. ऑनलाईन शिक्षण देताना शिक्षकांनी निरस धडे न देता दैनंदिन जीवनातील संदर्भ देत, जीवनाचे धडे देत, प्रश्न विचारण्यासाठी जागा देत, विचारमंथन प्रवृत्त करणाऱया शिक्षण पद्धतीचा अवलंब केल्यास मुलांना ऑनलाईन अभ्यासात रूची वाढेल.
ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेचा अवलंब करणाऱया शिक्षकांनी उपलब्ध असलेल्या वैकल्पिक साधनांचा वापर करणे सयुक्तिक ठरेल. ऑनलाईन शिक्षणासाठी आज खूपशी माध्यमे (ऍप) उपलब्ध आहेत. परंतु प्रत्येक माध्यमाला स्वतःच्या मर्यादा आहेत. तशा भक्कम बाजू सुद्धा आहेत. योग्य साधनांचा प्रभावी वापर करताना नियोजन करणे सुज्ञपणाचे ठरावे. निश्चित ऑनलाईन सत्रे घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासात गुंतवून ठेवण्याची ताकद शिक्षकात हवी. यासाठी ठरावीक वेळेनंतर प्रश्नमंजुषा, असाइन्मेंट्स देणे सयुक्तिक ठरेल. एखादा चित्रपट पहावा त्या सहजतेने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात गुंतून ठेवण्यावर भर देताना शिक्षण मनोरंजक करावे पण त्याचबरोबर शिक्षणाबाबत गंभीरता व जागरूकता दिसली पाहिजे, यावर भर द्यावा लागेल.
कोरोनाच्या कारणामुळे का असेना आज ऑनलाईन शिक्षण नकळत व सहजरित्या आपल्या घरापर्यंत नव्हे तर घराघरात पोहोचले असून सर्वांच्या अपेक्षेपेक्षा लवकर हा बदल घडला आहे. थेट मानवी संवादापासून आभासी वर्गापर्यंतचा हा बदल तसा सुलभरित्या संक्रमित व्हावा ही अपेक्षा करणे चुकीची ठरेल. ऑनलाईन वर्ग घेणे हे ठीक. त्याबाबत दुमत नाहीच. पण ते कसे द्यायचे, कसे घ्यायचे हे शिक्षकांना शिकविले जाणार असेल, तरच ते अर्थपूर्ण ठरेल.
डॉ. मनस्वी कामत








