कोल्हापूर / विनोद सावंत
महापालिकेच्या ऑनलाईन बांधकाम परवानगी देण्याच्या सॉप्टवेअरमध्ये कोणतीही दुरूस्ती झालेली नाही. अद्यपही सर्व त्रुटी तशाच आहेत. ऑनलाईन बांधकाम प्रणाली पुन्हा सुरू होवून महिना झाला असून बांधकामाच्या मोठय़ा प्रकल्पाची फाईल सबमिट होण्याची समस्या कायम आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत दुरूस्तीसाठी अवधी घेऊन नेमके राज्य शासनाने काय केले असा सवाल बांधकाम व्यावसायिकांतून व्यक्त होत आहे.
महापालिकेकडून बांधकाम व्यावसायिकांसह सामान्य नागरिकांना सुलभ व त्रासविरहित बांधकाम परवानगी मिळावी, या उद्देशाने ऑनलाईन बांधकाम परवानगीची सुविधा सुरू केली. 5 मे 2021 पासून प्रायोगिकतत्वावर कोल्हापुरात याची अंमलबजावणी झाली. यामध्ये अनेक त्रुटी असल्याने मोठय़ा प्रकल्पाच्या फाईली सबमिट होण्यास अडथळे निर्माण झाले. 250 पेक्षा जास्त मोठे प्रकल्प अडकले होते. बांधकाम क्षेत्रावर परिणाम झालाच शिवाय महापालिकेचे उत्पन्नही घटले. बांधकाम व्यावसायिकांच्या शिखर संस्था असणाऱया क्रीडाईने ही बाब राज्यशासनाच्या निदर्शनास आणली. राज्य शासनाने 18 सप्टेंबर 2021 पासून ऑनलाईन बांधकाम परवानगी सक्ती शिथिल करत 31 डिसेंबर 2021 पर्यंत ऑफलाईनने बांधकाम परवानगी देण्यास मान्यता दिली. दरम्यान, संबंधित विभागाने यामधील त्रुटी दूर करण्याचे आदेशही शासनाने दिले. साडेतीन महिन्याचा अवधी घेवूनही त्रुटीत काहीही दुरूस्ती न करताच 1 जानेवारीपासून ऑनलाईननेच बांधकाम परवानगी देणे बंधनकारक केले आहे.