वृत्तसंस्था/ बर्लिन
ऑनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेत विश्वनाथन आनंदच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले. शनिवारी झालेल्या नवव्या व दहाव्या फेरीतही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी रात्री उशिरा अग्रमानांकित चीन व अमेरिका यांच्यात सुपरफायनल होईल. युरोप संघ 13 गुणासह तिसऱया तर रशियन संघ 8 गुणासह चौथ्या स्थानी राहिला.
नवव्या फेरीत चीनविरुद्ध झालेल्या लढतीत भारतीय संघ 2.5-1.5 फरकाने पराभूत झाला. या लढतीत आनंदला विश्रांती देण्यात आली होती. विदीथ गुजराथी, पी.हरिकृष्ण व हरिका यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले तर बी अधिबान पराभूत झाला. यानंतर, दहाव्या फेरीच्या लढतीतही रशियाने भारताला 2.5-1.5 असे नमवले. या लढतीत कोनेरु हम्पीने एकमेव विजय मिळवला. हरिकृष्णने बरोबरी स्वीकारली. अधिबान व विदीथ यांना पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आले.
विशेष म्हणजे, सहा संघाच्या या ऑनलाईन स्पर्धेत भारताला शेष विश्व संघाविरुद्ध एकमेव विजय मिळवता आला. पाच गुणासह भारतीय संघ पाचव्या स्थानी राहिला. बलाढय़ चीन व अमेरिका यांनी अपेक्षित कामगिरी करताना पहिले व दुसरे स्थान प्राप्त करत अंतिम फेरीत धडक मारली.









