वृत्तसंस्था / बर्लिन :
पहिल्या ऑनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेत भारताला पहिल्या दिवशी शेष विश्व संघाकडून पराभव पत्करावा लागला. सहा संघांच्या या ऑनलाईन स्पर्धेला मंगळवारी सुरुवात झाली. त्यात सलामी लढतीत भारतीय संघाने अमेरिकन संघाला बरोबरीत रोखले होते तर दुसऱया लढतीत मात्र शेष विश्व संघाकडून 2.5-1.5 गुण अशा फरकाने भारताचा पराभव झाला. ग्रँडमास्टर बी. अधिबानचा पराभव हे भारताच्या अपयशाचे कारण ठरले. तसेच बुधवारी दुसऱया दिवशी भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. चीन व युरोपकडून भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
मंगळवारी झालेल्या भारत-अमेरिका लढतीत हम्पीने ऍना झोतोनकीशवर विजय मिळवला. तर आनंदला हिकारू नाकामुराने बरोबरीत रोखले. फॅबियानो कारुआनाने मात्र विदीत गुजरातीला मात देत लढत बरोबरीवर आणली. पी. हरिकृष्ण व लिनियर डॉमिंगेजचा डाव बरोबरीत सुटल्यामुळे भारत व अमेरिका यांच्यातील लढत 2-2 अशी बरोबरीत संपली. यानंतर, शेष भारत संघाविरुद्ध मात्र भारताला 2.5-1.5 फरकाने पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार आनंदला तैमुरने बरोबरीत रोखले. रॅपिड प्रकारातील विश्वविजेती कोनेरू हम्पी हीसुध्दा मारिया मुझीचूकला मात देऊ शकली नाही. पी. हरीहरन व अलीरझा फिरोझा यांचा डावसुध्दा बरोबरीत सुटला. विदीत गुजराथीच्या जागी संघात स्थान देण्यात आलेला बी. अधिबान मात्र पेरुच्या जॉर्ज कोरीकडून पराभूत झाल्याने भारतीय संघाने ही लढत गमावली.
दुसऱया दिवशीही भारताची निराशा
बुधवारी झालेल्या तिसऱया व चौथ्या फेरीतही भारतीय संघाला निराशेचा सामना करावा लागला. तिसऱया फेरीत युरोपियन संघाने भारताला 2.5-1.5 असा पराभवाचा धक्का दिला. सुरुवातीला भारताचा विश्वनाथन आनंद व मॅक्झिम यांच्यातील लढत बरोबरीत संपली. यानंतर, दिग्गज खेळाडून ऍरोनियन लेव्हॉनने विदीथ गुजरातीला नमवले. कोनेरु हम्पी व हरिकृष्ण यांनाही बरोबरी स्वीकारावी लागल्याने भारताला ही लढत गमवावी लागली.
तसेच चौथ्या फेरीतील लढतीतही बलाढय़ चीनने भारताला 2.5-1.5 असे नमवले. आनंद व चीनचा डिंग लिरेन यांची लढत बरोबरीत संपली. दुसऱया सामन्यात विदीथ गुजरातीला वांग हाओने नमवले.









