ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी आणण्याची फार्मसी असोसिएशनची मागणी
बेळगाव/ प्रतिनिधी
सध्या ऑनलाईन खरेदीचे फॅड सर्वत्र वाढले आहे. परंतु ही खरेदी आरोग्यासाठी धोक्मयाची ठरू शकते. कोणतीही खबरदारी न घेता औषधांची विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाईन औषध खरेदी करू नये व प्रशासनाने यावर बंदी आणावी, अशी भूमिका बेळगाव जिल्हा रिटेल फार्मसी असोसिएशनतर्फे पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.
मंगळवारी कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ऑनलाईन मागविण्यात आलेल्या औषधांच्या किमतीमधील तफावत दाखवून देण्यात आली. एका ग्राहकाने मागविलेल्या औषधाची किंमत अवघी 44 रुपये असताना ऑनलाईनमार्फत मात्र 105 रुपये आकारण्यात आली. याचबरोबर पाठविणारी दिल्ली येथील व्यक्ती प्रिन्स चिकन या नावाने औषधांची विक्री करत असेल तर या औषधांमागील विश्वासार्हता काय, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
औषधांची विक्री करताना काही नियम पाळावे लागतात. विक्री करणाऱयाकडे सरकारमान्य परवाना असणे गरजेचे आहे. परंतु ऑनलाईनमध्ये कोणतेच नियम पाळले जात नसल्यामुळे चुकीची औषध विक्री रुग्णाचा जीव घेऊ शकते. त्यामुळे ऑनलाईन औषध विक्रीवर निर्बंध आणण्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
पत्रकार परिषदेवेळी अध्यक्ष नंदकिशोर सारस्वत, नागोरी-नागोरी, सेपेटरी जयवंत साळुंखे, खजिनदार नितीन झंवर, रमेश जैन, बंडू सदलगे, महेश अनगोळकर, विनोद कोलीवाड, शैलेंद्र जैन, विक्रांत शानभाग, पवन देसाई, महेशगौडा पाटील यासह इतर सदस्य उपस्थित होते.









