जेष्ठ नागरिकांची डोकेदुखी वाढली
प्रतिनिधी/ सातारा
मागील दोन दिवसांपासुन शासनाने सुरू केलेल्या मोफत लसीकरण केंद्रांवर केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना लस देण्याचे सत्र सुरू केले आहे. यासंबंधीचा फलक ही लसीकरण केंद्राबाहेर लावण्यात आला आहे. त्यामुळे थेट लस घेण्याकरीता गेलेल्या नागरिकांना पुन्हा निराश होऊन माघारी फिरावे लागत आहे. याचा सर्वाधिक फटका हा ज्येष्ठ नागरिक व ज्यांच्याकडे अत्याधुनिक प्रकारचे मोबाईल नसलेले किंवा त्यांना वापरता न येणाऱयांना होत आहे.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सातारातर्फे केवळ सातारा, कराड, फलटण व वाई या फक्त शहरी भागातील कोविड-19 लसीकरण सत्र हे यापुढे 100 टक्के ऑनलाईन नोंदणीनुसार करण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यामुळे आता यापुढे ऑन दी स्पॉट लसीकरण हे बंद करण्याचा निर्णय मंगळवार पासुन घेतला आहे. ग्रामीण भागात मात्र पुर्वीप्रमाणेच लसीकरण सुरू असल्याचे प्रशासना तर्फे सांगण्यात येत आहे.
प्रशासनातर्फे घेतलेला हा निर्णय मात्र काही नागरिकांना चांगलाच डोकदुखी ठरत आहे. त्यातच लसीचा मागील काही दिवस तुटवडा भासत आहे, आणि दुसरीकडे सर्वांनी प्राधान्याने लस घ्यावी अशी सुचना वारंवार विविध माध्यमातुन करण्यात येते. पण आता लस घ्यायची तरी कशी असा सवाल मात्र काही नागरिकांकडुन करण्यात येत आहे.
ज्येष्ठ नागरिकांची डोकेदुखी आणखीनच वाढली
नव्याने घेण्यात आलेल्या या ‘ऑनलाईन पध्दतीनुसार लसीकरण’ या निर्णयाची सर्वाधिक डोकेदुखी ही ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. कारण कित्येक ज्येष्ठांना फोन केवळ उचलणे आणि बंद करणे किंवा फोनवर बोलणे इतकेच माहीत असते. तसेच त्यांना सध्याचे अत्याधुनिक प्रकारचे फोन ही वापरणे अवघड जाते. त्यामुळे आम्ही लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करायची तरी कशी असा सवाल ज्येंष्ठांकडुन करण्यात येत आहे.
प्रशासनाने विचार करावा
काही नागरिकांना साधा फोन नंबर सेव्ह करता येत नाही, अशा नागरिकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे असे काय शक्य आहे. ज्या प्रमाणे पल्स पोलिओ सारखे कार्यक्रम घरोघरी जाऊन राबविले त्याच प्रमाणे हे लसीकरण देखिल त्याच धर्तीवर राबवावेत सातारा शहरात केवळ चारच ठिकाणी लसीकरण मोहिम राबविले जाते ते ही 250 पर्यंत लस देण्यात येतात. अशात ही मोहिम वेळेत पूर्ण होणार आहे का, याचाही प्रशानाने विचार करावा. यासंबंधी मी डीएचओ आणि सीईओ यांच्याशी चर्चा करणार आहे.
ऍड. विनीत विलास पाटील








