दहावीचे वर्ग सुरू होऊन 15 दिवसांचा कालावधी पूर्ण
प्रतिनिधी / बेळगाव
दहावीचे वर्ग सुरू झाले असून 15 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. ऑनलाईन वर्गापेक्षा ऑफलाईन वर्गाला प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आठ-दहा महिने घरातूनच अभ्यास केल्याने विद्यार्थी कंटाळले आहेत. शिवाय पालकदेखील शैक्षणिक वाटचालीचा विचार करत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत आहेत. मात्र, दोन तासांच्या कालावधीत दहावी वर्गाला उपस्थित राहताना, ये-जा करताना अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. नोकरी व्यवसायाला जाणाऱया पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत सोडणे आणि घरी आणणे कठीण जात असल्याचे समोर आले आहे.
खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये अनेक विद्यार्थी विशेषतः वर्दी रिक्षा अथवा स्कूल बसचा आधार घेतात. सरकारी शाळांमधील विद्यार्थी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेतात. मात्र, दोन तासांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवास करताना अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. परिणामी दूरवरून प्रवास करून येणाऱया विद्यार्थ्यांना नियमित वर्गाला उपस्थित राहणे कठीण झाले आहे. ठराविक वेळेतच वाहने असणाऱया ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजचा प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभत असला तरी 20 ते 30 टक्के विद्यार्थ्यांना या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती
ऑनलाईन वर्गाला चांगला प्रतिसाद न लाभल्याने ऑनलाईन वर्गाकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षकांकडून दोन्ही वर्गांचा ताळेबंद साधताना गोंधळ उडत आहे. परिणामी पूर्वी ज्या पद्धतीने ऑनलाईन वर्गात सातत्य होते, तसे सातत्य व गांभीर्य दिसत नसल्याचे मत व्यक्त होत आहे. यामुळे ऑनलाईन वर्गाचा लाभ घेणाऱया विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे.
पहिला तास कोरोना जागृतीसाठी
बेळगाव : शाळा विद्येचे-ज्ञानाचे मंदिर असल्यामुळे शाळेत दाखल झाल्यानंतर परिपाठांतर्गत विद्येची प्रार्थना केली जाते. मात्र कोरोना काळात शाळांचा पहिला तास पारिपाठाचा नसून पहिला तास आरोग्याचा आहे. सामूहिक परिपाठ घेऊ नये, अशा सूचना असल्याने शाळांमधून दहावीचे वर्ग व विद्यागम अंतर्गत विद्यार्थ्यांचा परिपाठ घेण्यात येत नाही. तर थर्मल स्क्रिनिंग, मास्कची सक्ती, सॅनिटायझर्सचा वापर, सामाजिक अंतराचे भान आणि कोरोनापासून घ्यावयाची दक्षता यासाठी पहिला तास राखीव ठेवण्यात आला आहे.
विद्येचे मंदिर असणारी शाळा म्हणजे साक्षात सरस्वतीचे रुप. यामुळे शाळेला पूजनीय मानत दररोज परिपाठाच्या माध्यमातून राष्ट्रगीत, प्रतिज्ञा याबरोबरच प्रार्थनादेखील केली जाते. यामुळे शाळेत पहिला तास हा परिपाठाचाच असतो. सामूहिकरित्या परिपाठचे आयोजन करून विद्यार्थ्यांचे मन प्रसन्न झाल्यानंतर अध्यापन करण्यात येते. मात्र, कोविड 19 मध्ये शाळा सुरू करताना परिपाठाचे सामूहिक रुप व कोरोनापासून वाचण्यासाठी सामाजिक अंतराचे भान याचा ताळमेळ साधताना मार्गदर्शक सूचीमध्ये सामूहिक परिपाठ घेऊ नये, अशा सूचना असल्याने थेट अध्यापन होत आहे.
मार्गदर्शक वर्ग केवळ दोन तास
शाळांचा कालावधी 6 ते 7 तासांचा असल्याने नियोजित वेळापत्रकात अर्धा किंवा पाऊण तास परिपाठासाठी आरक्षित असतो. मात्र, सध्या सुरू केलेल्या वर्गासाठी केवळ दोन तास शाळा असल्याने परिपाठासाठी वेळ न घालवता कोरोना मार्गदर्शक प्रणालीबाबतची जागृती व अंमलबजावणी करत शाळास्तरावर तासिका घेतल्या जात आहेत. संस्कार, संस्कृतीचा भाग म्हणून परिपाठाकडे पाहिले जाते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत आरोग्य, अध्यापनासाठी असणारा कमी वेळ आणि परीक्षा यामुळे दोन तासात अध्यापन आटोपण्याकडे कल असल्याचे दिसून येत आहे.