बुंदेस्लिगा फुटबॉल : युनियन बर्लिनचा सामनाही गोलबरोबरीत
वृत्तसंस्था/ ऑग्सबर्ग, जर्मनी
फिलिप मॅक्सने अखेरच्या टप्प्यात नोंदवलेल्या बरोबरीच्या गोलामुळे ऑग्सबर्ग एफसीला कोलॉन एफसीविरुद्धचा बुंदेस्लिगामधील सामना 1-1 असा बरोबरीत सोडविण्यात यश आले.
या सामन्यात कोलॉन संघाने 85 व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून उतरलेल्या अँथनी मॉडेस्टने गोल नोंदवल्यानंतर आघाडी घेतली होती. या निकालानंतर कोलॉनने 30 सामन्यांत 35 गुण मिळवित 12 वे स्थान मिळविले आहे तर तेराव्या स्थानावर असणाऱया ऑग्सबर्गचे 32 गुण झाले आहेत. दोन्ही संघ पदावनती झोनपासून दूर राहिले असून 28 गुण मिळविणाऱया फोर्चुना डुसेलडॉर्फला पदावनती प्लेऑफ खेळावे लागणार आहे.
ऑग्सबर्गला या सामन्यात सुदैवानेच एक गुण मिळविता आला. त्यांचा स्ट्रायकर फ्लोरियन नीडेर्लेचनरने पूर्वार्धात तीन चांगल्या संधी वाया घालविल्या. त्यात 27 व्या मिनिटाला मिळविलेल्या पेनल्टीचा समावेश आहे. कोलॉनचा गोलरक्षक टिमो हॉर्नने शानदार गोलरक्षण केल्यामुळे त्यांच्या या संधी वाया गेल्या. मॉडेस्टने कोलॉनला आघाडी मिळवून दिल्यानंतर 88 व्या मिनिटाला लेफ्टबॅक मॅक्सने राफाएल फ्रामबर्गरच्या क्रॉस पासवर गोल नोंदवून ऑग्सबर्गला बरोबरी साधून दिली. या स्पर्धेच्या अद्याप चार फेऱया बाकी असून पुढच्या मोसमात अव्वल लीगमध्ये कायम राहण्यासाठी या दोन्ही संघांना बरेच परिश्रम घ्यावे लागणार आहेत. कोलॉनची पुढील लढत युनियन बर्लिनशी पुढील शनिवारी तर ऑग्सबर्गची लढत मेन्झशी पुढील रविवारी होणार आहे.
युनियन बर्लिनचा सामनाही अनिर्णीत
बर्लिन येथे झालेल्या या स्पर्धेतील एका सामन्यात शॅल्क 04 संघाने युनियन बर्लिनविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधली. सलग बारा सामन्यांत शॅल्क 04 संघाला विजय मिळविता आला नसून त्यांनी क्लब विक्रमाशी बरोबरी केली आहे. शॅल्क संघाला 17 जानेवारीपासून एकही सामना जिंकता आलेला नाही. ते 38 गुणांसह दहाव्या स्थानावर कायम आहेत. युनियन बर्लिनने 32 गुणांसह 13 व्या स्थानावर मजल मारली आहे. 11 व्या मिनिटाला अँथनी उजाहच्या पासवर रॉबर्ट अँड्रिचने युनियनचा गोल नोंदवल्यानंतर जोन्जोई केनीने गोल नोंदवून शॅल्कला बरोबरी साधून दिली. शॅल्कचा गोलरक्षक न्यूबेलने 87 व्या मिनिटाला केवेनचा फटका अडवून अप्रतिम बचाव केल्याने शॅल्कचा पराभव टाळला गेला. या लीगमध्ये बायर्न म्युनिच 70 गुणांसह अग्रस्थानावर असून त्यांनी जेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली आहे.









