भाजपचा शाब्दिक हल्लाबोल : संपुआ काळात घोटाळा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी चॉपर घोटाळय़ात काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा समावेश असल्याचा आरोप झाल्यावर भाजपने जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने देशाच्या सुरक्षेशी नेहमीच प्रतारणा केल्याने संरक्षण घोटाळय़ात त्याच्या नेत्यांची नावे ही येणारच अशा स्वरुपात केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शाब्दिक हल्ला चढविला आहे. एका वृत्त अहवालात घोटाळय़ातील मुख्य आरोपी राजीव सक्सेनच्या चौकशीचा तपशील प्रसिद्ध करण्यात आला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीत सक्सेनाने अहमद पटेल, सलमान खुर्शीद आणि कमलनाथ यांची नावे घेतली होती.
संरक्षणव्यवहारात ‘किकबॅक’चा विचार केल्यास काँग्रेसच्या एखाद्या नेत्याचे नाव समोर येते. जीप घोटाळय़ापासून बोफोर्सपर्यंत, पाणबुडी घोटाळा, ऑगस्टा वेस्टलॅँड प्रकरणात काँग्रेस नेत्यांना आर्थिक लाभ दिल्याशिवाय कुठलेच काम झाले नसल्याचा आरोप प्रसाद यांनी केला आहे.
संपुआ काळात अर्थलाभाशिवाय कुठलेच काम होत नव्हते, कुठलाच व्यवहार अर्थपूर्ण डीलशिवाय होत नव्हता. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांना याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावे लागेल, असे प्रसाद म्हणाले.
संरक्षण दलाल सुशेन मोहन गुप्ता आणि कमलनाथ यांचे भाचे रतुल पुरी याच्याशी झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीवर ईडीची चौकशी केंद्रीत राहिली होती. गुप्ता आणि खैतानने सत्तावर्तुळात स्वतःचा दबदबा दाखवून देण्यासाठी वारंवार मोठमोठय़ा नेत्यांची नावे घेतली होती. दोघेही अनेकदा सलमान खुर्शीद आणि कमलनाथ यांचे नाव घेत होते. तर एपी हा उल्लेख अहमद पटेल यांच्या संदर्भात होता असे सक्सेनाने चौकशीत म्हटले होते. सक्सेनाने रतुल पुरी आणि त्याच्या कुटुंबीयाच्या एका कंपनीत रक्कम हस्तांतरित केली होती.









