शेंडापार्क, आर.के. नगर येथील प्रकार
पाचगाव / प्रतिनिधी
शेंडा पार्क येथील ऑक्सीजन पार्क शेजारील वाळलेल्या गवताला आग लागून पुन्हा शेकडो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याचा धोका निर्माण झाला होता. गुरुवारी दुपारी अचानक आर.के.नगर येथील रस्त्याकडील गवताला आग लागली. नागरिकांनी अग्निशमन दलाला तात्काळ कळविले. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणली.
मागील वर्षी शेंडा पार्क येथील ऑक्सीजन पार्क मधील वाळलेल्या गवताला आग लागली होती .या आगीने रौद्ररूप धारण केले होते. यामध्ये सुमारे वीस हजार झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. त्यानंतर आमदार ऋतुराज पाटील आणि काही स्वयंसेवी संस्थांनी त्या झाडांना पाणी घालून जगवले होते.
पुन्हा या वर्षी या ऑक्सिजन पार्क मधील गवत वाढले होते. या वाळलेल्या गवतामुळे या झाडांना आगीचा धोका आहे अशा संदर्भाची बातमी ‘तरुण भारत’ने काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केली होती .मात्र प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गुरुवारी पुन्हा एकदा ही झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडणार होती. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच ही झाडे आगी पासून वाचली. आता तरी प्रशासनाने जागे व्हावे आणि या ऑक्सीजन पार्क मधील वाळलेले गवत तात्काळ काढून घ्यावे अशी मागणी पाचगावचे माजी उपसरपंच संग्राम पोवाळकर यांनी केली आहे.









