प्रतिनिधी/ बेळगाव
कोविडला आळा घालण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक सेवा संघटना पुढे आल्या आहेत. आयसोलेशन सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना मदतीचा आधार देण्याचा प्रयत्न अनेक जण करत आहेत. मात्र, सध्या बेळगाव शहरात ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्सचा तुटवडा अनेकांसाठी जीवघेणा व त्रासदायक ठरू लागला आहे. वेळेत श्वास न मिळाल्याने तो रोखला जावून मृत्यू पावणाऱयांची संख्या वाढत चालली असून वाढीव सुविधा व सुविधेचे नियोजन याची फार मोठी गरज निर्माण झाली आहे.
कोरोनाची बाधा झाल्यानंतर प्रत्येकाला वेळेत उपचार मिळणे हा त्या रुग्णाचा अधिकार आहे. मात्र, रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची प्रचंड गोची होत आहे. महागडय़ा इस्पितळात जाऊन उपचार घेणे सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांना परवडत नाही. इतर ठिकाणी मानवी शरीराला श्वास पुरविणाऱया यंत्रणा अपुऱया पडत आहेत. बिम्स इस्पितळात जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण असा समज नागरिकांत पसरल्यामुळे खासगी उपचारांसाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. मात्र, सर्वच ठिकाणी हाऊसफुल्लचे फलक लावण्यात आल्याने करायचे काय? हा प्रश्न गंभीर बनला आहे.
बेळगाव जिल्हा प्रशासनाने सध्या महाराष्ट्र पॅटर्नची अंमलबजावणी करण्याची सर्वात मोठी गरज आहे. कोणत्या इस्पितळात किती ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत याचा आढावा घेऊन ही माहिती सर्वत्र प्रसिद्ध करण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे. ऐनवेळी ऑक्सिजन मिळाला नाही तर काय करायचे? या प्रश्नाचे सध्या कोणाकडेच उत्तर नाही. यामुळे योग्य ती उपाययोजना हाती घेण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करणे गरजेचे
सद्यपरिस्थितीत सेवाभावी संस्थांमार्फत उपलब्ध होणाऱया ऑक्सिजन सिलिंडरचा वापर करून घराच्या घरी आपला श्वास सुस्थितीत ठेवण्यावर अनेकांचा भर आहे. दरम्यान, कोविड झाला आहे की नाही हे कळण्यापूर्वीच अचानक श्वास रोखला जावून अनेकांचे मृत्यू होऊ लागले आहेत. हृदयविकार व इतर समस्या बळावत आहेत. यामुळे प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन झाल्यास अनेकांचा सेवेअभावी जाणारा जीव वाचविता येईल, असे मत व्यक्त होत आहे.









