पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची अधिकाऱयांना सक्त ताकीद, रेमडेसिवीर इंजेक्शनासाठी अधिक रक्कम घेतल्यास कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाग्रस्त रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार करावेत. सरकारी, खासगी हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आहेत त्यांची संपूर्ण माहिती रोजच्यारोज सरकारकडे अपडेट करावी. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनदेखील कमी पडू देऊ नका, अशी सक्त ताकीद उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱयांना केली आहे.
पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी पहिलीच बैठक घेऊन अधिकाऱयांची झाडाझडती घेतली. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार करणे गरजेचे आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये नागरिकांना सर्व वैद्यकीय सुविधा 24 तास उपलब्ध कराव्यात, असे त्यांनी अधिकाऱयांना बजावले.
ऑक्सिजनची कमतरता असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी नियोजन करुन प्रत्येक हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवठा करा, असे त्यांनी यावेळी सांगितले. रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्धतेबाबतही अधिकाऱयांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. कोणीही रेमडेसिवीर इंजेक्शनचा गैरवापर केला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. खासगी हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर देताना अधिक रक्कम घेतल्याचे समजले तर त्यांना नोटीस द्यावी आणि कठोर कारवाईही करावी, असा आदेशही त्यांनी दिला.
व्हेंटिलेटर सुविधेबाबतही त्यांनी सुचना केल्या आहेत. जिल्हय़ात कोणत्याही प्रकारच्या औषधांचा तुटवडा असेल तर इतर जिल्हय़ातून देवाण-घेवाण करावी आणि प्रत्येकाने काळजीपूर्वक रुग्णांवर उपचार करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
लसीकरण मोहीम राबविण्याबाबत मार्गदर्शन
लसीकरण मोहीम राबविणे महत्त्वाचे आहे. सिलिंडरचे वितरण करणारे जे कर्मचारी आहेत ते घरोघरी सिलिंडर पोहोचविण्याचे काम करत असतात. त्यांना तसेच नाभिक यांना प्रथम लस देण्यासाठी प्राधान्य द्या. बेळगाव जिल्हा हा मोठा जिल्हा आहे. त्यामुळे लसीकरणास टप्प्याटप्प्याने सुरूवात करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन, तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी नियोजन करुन तयारी करावी. सरकारने यासाठी योग्य प्रकारे निधी उपलब्ध केला आहे. त्या निधीचा उपयोग करुन कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी पावले उचलली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा आरोग्याधिकारी शशिकांत मुन्याळ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.









