सरकारसह जिल्हा प्रशासनावर टीकेची झोड : सामान्य नागरिकांतून संताप
प्रतिनिधी / बेळगाव
ऑक्सिजन संपला आहे तुमचा रुग्ण घेवून जा, असे निरोप खासगी हॉस्पिटलच्या संचालकांकडून कोरोनाग्रस्ताच्या कुटुंबीयांना देण्यात येत आहेत. यामुळे त्या कुटुंबाच्या पायाखालची वाळूच घसरत आहे. ऑक्सिजन नाही तर पुढे काय? असा प्रश्न पडला आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी अक्षरशः साऱयांचीच तडफड होताना दिसत आहे. मात्र मुर्दाड जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारला तसेच लोकप्रतिनिधींना त्याचे काहीच देणे-घेणे नाही. यामुळे सर्वसामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे.
तुमचे राजकारण गेले चुलीत आम्हाला आमच्या कुटुंबाला सांभाळायचे आहे. अशा वेळेला जर तुमची मदत मिळत नसेल तर तुम्हाला सरकार कसे म्हणायचे. काही ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा होत असताना तो राजकीय द्वेषातून बंद करणे, याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटल तसेच इतर खासगी हॉस्पिटलमधीलही पुरवठा बंद झाल्यानंतर तजबीज करायची ही खेदाची बाब आहे.
जनतेच्या सेवेसाठीच अधिकाऱयांची नेमणूक केली जाते. लोकप्रतिनिधींना निवडून दिले जाते. मात्र आणीबाणीवेळीच सर्वसामान्य जनतेला ऑक्सिजनसाठी धावाधाव करावी लागत आहे. यामुळे सर्व विभाग आणि समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दुसरी लाट येणार हे माहिती असताना ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा करता आला नाही. वास्तविक 100 ते 200 वर्षांमध्ये येणाऱया आपत्तीची तजबीज केली जाते. मात्र कोरोनाबाबत काहीच गांभीर्य घेण्यात आले नाही. यामुळे संताप व्यक्त होत आहे.
काही वकिलांना कोरोना झाला असून उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्या ठिकाणचा ऑक्सिजन संपल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना तुमचा रुग्ण घेवून जा, असे सांगण्यात आले. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी बेळगाव बार असोसिएशनशी संपर्क साधला. यावेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱयांनी ऑक्सिजनबाबत अधिकाऱयांशी संपर्क साधला असता ऑक्सिजन नाही आम्ही काय करू, अशी उत्तरे देण्यात आली.
वकील व इतरांच्या बाबतीतच अशा प्रकारे अधिकाऱयांकडून उत्तरे मिळत आहेत तर सर्वसामान्य जनतेचे हाल किती होत असतील? ऑक्सिजनविना अनेक जण तडफडत आहेत. तरी थोडीही चाड जिल्हा प्रशासनाला नाही. याची खंत उपाध्यक्ष गजानन पाटील यांनी व्यक्त केली. अशी परिस्थिती राहिल्यास यापुढे राजकीय व्यक्तींना जनतेने धडा शिकविल्या शिवाय पर्याय नसल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली.