सध्या देशभर द्रवरूप ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाचे रुग्ण अचानक वाढल्याने ऑक्सिजनला कधी नव्हे इतकी मागणी असून पुरवठा मात्र म्हणावा तसा नाही. तथापि, हिमाचल प्रदेशमधील छोटी काशीमंडी या छोटय़ा शहरातील एका वायू उत्पादक उद्योगपतीने गरिबांना विनामूल्य ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्याचे कार्य हाती घेतले आहे. या उद्योगपतीचे नाव सुधांशू कपूर असे असून त्यांचा छोटा वायू उत्पादन कारखाना आहे. ऑक्सिजनची मागणी जशी वाढू लागली तशी त्यांनी घोषणा केली, की कोणत्याही गरिबाचे श्वास ऑक्सिजनच्या तुटवडय़ामुळे थांबणार नाहीत, याची पूर्तता आपण करू. त्यानुसार ते त्यांच्या कारखान्याच्या परिसरातील तसेच दूरवरच्या भागातीलही कोरोनाग्रस्त आणि ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱया गरिबांना विनामूल्य ऑक्सिजन सिलिंडर पुरवितात.
यंदाच्या संपूर्ण आर्थिक वर्षात एक पैशाचाही फायदा झाला नाही तरी चालेल पण शक्मय तितक्मया गरिबांचे प्राण ऑक्सिजनचा पुरवठा करून वाचविण्याचे आपले ध्येय आहे, असे ते सांगतात. त्यांचा कारखाना तसा मोठा नाही. तथापि, मन मोठे आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या फायद्याचा विचार न करता केवळ गरिबांसाठी ऑक्सिजन पुरवठा सुरू केला आहे. ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन ऑक्सिजन सिलिंडर्सची साठेबाजी करून कोटय़वधी रुपयांचा नफा कमावल्याची उदाहरणे समोर असताना सुधांशू कपूर यांचा त्याग आणि प्रामाणिकपणा खरोखरच सर्वांसाठी आदर्शवत आहे.









