ऑनलाईन टीम / मुंबई :
विशाखापट्टणमहून ऑक्सिजन आणण्यासाठी कळंबोलीहून रवाना झालेल्या रेल्वेने परतीचा प्रवास सुरू केला आहे. आज रात्री ही रेल्वे नागपूरला पोहचेल आणि उद्या सकाळी नाशिकमध्ये दाखल होईल. परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
झपाट्याने होणाऱ्या कोरोना रुग्णवाढीमुळे देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ऑक्सिजन ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला. कळंबोली येथून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस काल विशाखापट्टनमला पोहोचली. या रेल्वेने परतीचा प्रवास सुरू केला असून, विशाखापट्टणमहून महाराष्ट्राला रवाना झालेली ही पहिलीच ऑक्सिजन एक्स्प्रेस आहे.
राष्ट्रीय स्टील निगम लिमिटेड, विशाखापट्टणम स्टील प्लान्टमधून सात रिकाम्या टँकरमध्ये ऑक्सिजन भरून ही रेल्वे महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. सर्व टँकरमधून 100 टनांहून अधिक लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा महाराष्ट्राला होणार आहे.









