आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सरकारवर हल्लाबोल : सर्वसामान्य जनतेला सुविधा उपलब्ध करा
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. ऑक्सिजन नाही, इंजेक्शन नाही, बेड नाहीत, वेळेत उपचार मिळत नाहीत, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करण्यासाठी जागा नाही. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी भाजप सरकार पूर्णपणे अपयशी झाले असून हेच काय अच्छे दिन? असा खोचक प्रश्न आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उपस्थित केला.
कोरोना काळात राजकारण बाजुला ठेवून प्रत्येकाने मदत करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी प्रथम सरकारकडून प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. ऑक्सिजन किंवा औषधाविना उपचार करणे हे अशक्मयच आहे. तेंव्हा प्रथम या सर्व प्राथमिक सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली आहे.
सोमवारी काँग्रेसच्या सर्व आमदार व नेत्यांनी जिल्हाधिकाऱयांची भेट घेवून कोरोनाबाबत निर्माण झालेल्या समस्यांचे गाऱहाणे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासमोर मांडले. लोकांना उपचार मिळत नसल्यामुळे जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे, असे यावेळी सांगण्यात आले. खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी 85 लाख खर्च करून तातडीने ऑक्सिजन प्लान्ट उभे करता येते. त्यासाठी सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
खानापूर तालुक्मयामध्ये मृतदेहावर अंत्यविधी करताना मोठी समस्या निर्माण होत आहे. कोरोनाग्रस्त व्यक्ती दगावल्यानंतर अंत्यविधी करण्यास कोणच पुढे येण्यास तयार नाहीत. प्रशासनही मदत करण्यास तयार नाही. असे त्यांनी सांगितले. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ग्रामीण मतदार संघामध्ये अजून लसीकरणच करण्यात आले नाही. त्यावर ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केलेल्यांना आम्ही लसीकरण करत असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. त्यावर ग्रामीण भागातील जनतेला ऑनलाईवरून आपले नाव नोंदवता येते काय, असा प्रश्न उपस्थित केला.
कोरोना नियंत्रण करण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास गंभीर समस्या उद्भवणार आहे. तेंव्हा तातडीने सरकारने आर्थिक मदत करावी आणि रुग्णांना उपचार करण्यास पुढाकार घ्यावा, असे सांगण्यात आले.
यावेळी आमदार सतीश जारकीहोळी, विधानपरिषद सदस्य महांतेश कौजलगी, अप्पर जिल्हाधिकारी योगेश्वर, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्यासह इतर काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.









