ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ऑक्सिजनची गरज वाढवून सांगितल्याचा आरोपाला अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केजरीवाल यांनी ट्विट करत आपली बाजू मांडली आहे.

अरविंद केजरीवाल आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मी दोन कोटी लोकांच्या जीवासाठी लढलो हा माझा गुन्हा आहे. जेव्हा तुम्ही निवडणुकीसाठीच्या प्रचारसभा करत होता त्यावेळी मी रात्र रात्र जागून ऑक्सिजनची व्यवस्था करत होतो. लोकांना ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी मी भांडलो, हात पसरले, विनंत्या केल्या. लोकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे. त्यांना खोटारडे म्हणू नका, त्यांना फार वाईट वाटत आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या ऑक्सिजन ऑडिट समितीने दिलेला अहवाल अस्तित्वातच नसून हा भाजपाने तयार केला आहे असा गंभीर आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असे सांगताना मनिष सिसोदिया यांनी अहवालात नमूद करण्यात आलेली माहिती खोटी असल्याचे म्हटले होते.









