वकिलांची जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे मागणी : कोरोना रुग्णांच्या मांडल्या तक्रारी
प्रतिनिधी / बेळगाव
ऑक्सिजन नसल्यामुळे अनेक रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही जणांचा तर ऑक्सिजनविना मृत्यू होत आहे. चामराजनगर येथे 24 जणांचा मृत्यू झाला आहे. बेळगावमध्येही समस्या गंभीर आहे. ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे अनेक खासगी रुग्णालये आणि सरकारी रुग्णालयातून रुग्णांना परत पाठविले जात आहे. तेंव्हा तातडीने ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध करावा, अशी मागणी वकिलांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना काळात जिल्हा प्रशासनाने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र जिल्हा प्रशासन याबाबत गांभीर्य घेत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अनेक रुग्णांलयांमध्ये ऑक्सिजन नाही अशा तक्रारी वाढल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने मिटिंग घेण्याऐवजी प्रत्यक्षात हॉस्पिटलमध्ये जाऊनच त्याची विचारपूस करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. सर्वत्र ऑक्सिजन उपलब्ध होईल, असे आश्वासन दिले आहे. ऍड. एन. आर. लातूर यांनी ऑक्सिजन नसलेल्या खासगी हॉस्पिटलची यादीच वाचून दाखविली. याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती गंभीर आहे. त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. तेंव्हा संबंधित हॉस्पिटलच्या अधिकाऱयांना सक्त ताकीद करावी, असे त्यांनी सांगितले.
भ्रष्टाचार निर्मूलन परिवार संघटनेचे अध्यक्ष सुजित मुळगुंद यांनीही जिल्हाधिकाऱयांना रुग्णांच्या तक्रारी सांगितल्या. यावेळी ऍड. एल. वाय. पाटील, ऍड. मारुती कामाण्णाचे, ऍड. एस. आय. गणमुखी, ऍड. एम. एस. पाटील, ऍड. शाहीन जमादार, ऍड. निवेदिता सूर्यवंशी, ऍड. यशवंत लमाणी, संजीवकुमार भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









