कडोली येथील आरोग्य केंद्रात घडला प्रकार : संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱयांना विचारला जाब
वार्ताहर / कडोली
ऑक्सिजनअभावी शनिवारी कडोली येथे एका तरुणाचा तडफडून मृत्यू झाल्याप्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी ग्राम पंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला जाब विचारून गावात ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करावीत, अशी मागणी केली.
याबाबत अधिक माहिती अशी, की कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील वषी आमदार सतीश जारकीहोळी यांनी कडोली ग्राम पंचायतीला दोन ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था केली होती. त्यामुळे गावकऱयांना थोडा दिलासा मिळाला होता. इमर्जन्सी कोरोना रुग्णांना याचा लाभ होणार, या आशेने याकडे सर्वजण पाहात होते. याची सर्व जबाबदारी ग्राम पंचायतीकडे देण्यात आली होती. परंतु, ही सिलिंडर ऐनवेळी उपलब्ध नसल्याने कडोली गावात एकच गोंधळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
येथील कचेरी गल्लीतील एका विवाहित होतकरू तरुणाला ऐनवेळी ऑक्सिजन मिळाला नसल्याने मृत्युला सामोरे जावे लागले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन करून ग्राम पंचायतीवर प्रश्नांचा भडिमार केला. सर्व ठिकाणी कोरोना महामारीमुळे हाहाकार उडाला असून कोरोनाबाधित रुग्णांची सोय करण्यासाठी ठिकठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून मदत केली जाते. तशी सोय कडोली येथे का करण्यात आली नाही? ऑक्सिजनची व्यवस्था करणार की नाही? असे अनेक प्रश्न विचारून ग्राम पंचायतीला अनुत्तरित करण्यात आले.
आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा
ग्राम पंचायतीमधील बैठक आटोपून संतप्त ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा कडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर नेऊन तेथील प्रमुख वैद्याधिकारी श्री. हळ्ळीकेरी यांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. येथील डॉक्टर रुग्णांना पाच फूट अंतरावर ठेवून केवळ चौकशीद्वारे औषधे देतात. रुग्णांना तपासले जात नाही. त्यांचे निदान कसे होणार? असे प्रश्न उपस्थित केले. कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन मिळत नाही, याला काय म्हणावे? असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा यापुढे रुग्णांवर चांगले उपचार करा, अन्यथा टाळे ठोकू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.









