वृद्धांमध्येही ठरली प्रभावी : शरीरात सुरक्षात्मक अँटीबॉडीज अन् टी सेल्सची झाली निर्मिती
कोरोनावरील लसीच्या जागतिक शर्यतीत आघाडीवर असलेल्या एस्ट्राजेनेकाला एक मोठे यश मिळाले आहे. कंपनीची लस वृद्धांमध्येही नोवेल कोरोना विषाणूच्या विरोधात प्रभावी इम्युन रिस्पॉन्स तयार करण्यास यशस्वी ठरली आहे. लसीमुळे वृद्धांच्या शरीरात प्रोटेक्टिव अँटीबॉडीज आणि टी सेल्सची निर्मिती झाली. संबंधित वृत्तअहवालात संशोधनाशी निगडित दोन अज्ञात व्यक्तींचा दाखला देण्यात आला आहे. एस्ट्राजेनेकाने ही लस ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांसोबत मिळून तयार केली आहे. या लसीची भारतातही तिसऱया टप्प्यातील चाचणी सुरू आहे. लसीला कोविशिल्ड नाव देण्यात आले आहे. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने एस्ट्राजेनेकाशी कोविशील्डच्या 100 कोटी डोसचा करार केला आहे.
प्रभावी ठरली कोविशील्ड
जुलै महिन्यात ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीचा इम्युनोजेनिसिटी डाटा प्रसिद्ध करण्यात आला होता. नव्या अहवालात रक्त चाचण्यांचे मिळालेले निष्कर्ष जुलैतील डाटाशी मिळतेजुळते आहेत. तेव्हा लस 18 ते 55 वयोगटातील स्वयंसेवकांमध्ये ‘मजबूत इम्युन रिस्पॉन्स’ तयार करण्यास यशस्वी ठरली होती.
चाचणी रोखली होती
एस्ट्राजेनेकाने सप्टेंबरमध्ये स्वतःच्या लसीची चाचणी रोखली होती. ब्रिटनमध्ये एक स्वयंसेवक आजारी पडला होता. परंतु कंपनीने नंतर अमेरिका वगळता उर्वरित सर्वत्र ठिकाणी चाचणी सुरू केली होती. अमेरिकेने मागील आठवडय़ात एस्ट्राजेनेकाला पुन्हा लसीची चाचणी करण्याची अनुमती दिली आहे.
आघाडीवर कोविशील्ड
जागतिक शर्यतीत ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची लस सर्वात आघाडीवर असल्याचे बोलले जाते. कंपनीनने सर्व आवश्यक खबरदारीसह चाचणी चालविली असून त्यांची प्रक्रिया देखील अत्यंत पारदर्शक आहे. जगातील अनेक देशांनी एस्ट्राजेनेकासोबत या लसीच्या कोटय़वधी डोसच्या खरेदीचा करार केला आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत ही लस बाजारात येईल अशी अपेक्षा कंपनीला आहे. या लसीसह जगभरात किमान 9 लसी अंतिम टप्प्यातील चाचणीत आहेत. यात फायजर, मॉडर्नासह चीनच्या 5 लसी सामील आहेत.









