वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील वीज विक्री वर्षाच्या आधारे ऑक्टोबरमध्ये 13.38 टक्क्यांनी वाढून जवळपास 111 अब्ज युनिटवर पोहोचली आहे. वीज विक्रीत इतक्या मोठय़ा प्रमाणात तेजी येण्यासाठी औद्योगिक आणि वाणिज्य क्षेत्रातील गतीचा प्रभाव राहिला असल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे.
ऑक्टोबर महिन्यात देशातील वीज विक्री 110.94 अब्ज युनिटवर राहिली आहे. तसेच मागील वर्षातील ऑक्टोबरमध्ये हा आकडा 97.84 अब्ज युनिटवर राहिली असल्याची माहिती वीज मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीतून सांगितली आहे. मागील महिन्यात तज्ञांकडून ऑक्टोबरमध्ये वीज विक्री दोन आकडय़ाची वृद्धी करणार असल्याचे संकेत व्यक्त करण्यात आले होते. ती स्थिती प्रत्यक्षात पहावयास मिळाली आहे. मागील महिन्यात पहिल्या पंधरवडय़ात वीज विक्री 11.45 टक्क्यांनी वाढून 55.37 अब्ज युनिटवर राहिली होती.









