वृत्तसंस्था / ऑकलंड :
अमेरिकेची माजी टॉप सीडेड महिला टेनिसपटू सेरेना विलीयम्सना जेतेपदाचा दुष्काळ तब्बल तीन वर्षांनंतर संपुष्टात आला. रविवारी येथे झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील ऑकलंड खुल्या महिलांच्या क्लासिक टेनिस स्पर्धेचे जेतेपद सेरेना विलीयम्सने आपल्याच देशाच्या बिगर मानांकित पेगुलाचा पराभव केला. ऑस्ट्रेलियातील भीषण वणव्यात बळी पडलेल्यासाठी सेरेनाने आपली बक्षिसांची रक्कम मदत म्हणून जाहीर केली.
दहाव्या मानांकित सेरेना विलीयम्सने रविवारी झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पेगुलाचा 6-3, 6-4 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. 2017 साली मेलबोर्न येथील डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धा यापूर्वी सेरेनाने जिंकली होती. सेरेनाने या जेतेपदाबरोबरच 43,000 अमेरिकन डॉलर्सचे रोख बक्षीस पटकाविले. दरम्यान ऑस्ट्रेलियातील वणव्यात बळी पडलेल्या व्यक्तीसाठी सेरेनाने या स्पर्धेतील रोख रकमेचे बक्षीस मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला. किमान 20 वर्षे आपण ऑस्ट्रेलियात टेनिस खेळत असल्याने ऑस्ट्रेलियातील या नैसर्गिक दुर्घटनेबद्दल आपल्याला तीव्र दुख होत असल्याचे सेरेनाने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियातील जंगली परिसराला लागलेल्या भीषण आगीत अनेक जनावरे तसेच व्यक्ती बळी पडले आहेत.
ऑकलंड स्पर्धेतील जेतेपदामुळे सेरेनाचा आत्मविश्वास वाढला आहे. आता चालू महिन्याच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियात होणाऱया ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत जेतेपद मिळविण्यासाठी सेरेना पुन्हा नव्या जोमाने सहभागी होणार आहे. 38 वर्षीय सेरेनाने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 23 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपद मिळवेले असून मार्गारेट कोर्टच्या 24 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदाच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी सेरेनाला लाभली आहे. ऑकलंड स्पर्धेत पेगुलाने उपांत्य सामन्यात कॅरोलिनी वोझनियाकीचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. सेरेनाने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत डब्ल्यूटीए टूरवरील 73 स्पर्धा जिंकल्या आहेत. 1999 साली तिने डब्ल्यूटीए टूरवरील पहिली स्पर्धा जिंकली होती.









