जुन्या सचिवालयासमोर स्वातंत्र्याचा मुख्य सोहळा
प्रतिनिधी/ पणजी
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम जुन्या सचिवालयाजवळ होणार असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात येणार आहे. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा स्वतंत्र झाल्यानंतर याच ठिकाणी सर्वप्रथम ध्वज फडकावण्यात आला होता. त्या ऐतिहासिक ध्वजस्तंभावरच आज अमृतमहोत्सवी राष्ट्रध्वज फडकावण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सकाळी 9.15 वाजता हा कार्यक्रम प्रारंभ होणार असून त्यानंतर गोवा पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांना सलामी देण्यात येईल. याच कार्यक्रमादरम्यान गोवा स्वातंत्र्यलढय़ातील थोर सेनानींच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येईल. तसेच नंतर गोवा तसेच गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देताना वीरगती प्राप्त झालेल्या 75 स्वातंत्र्यसैनिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मरणोत्तर सन्मान करण्यात येणार आहे. त्याशिवाय पोलिसांनाही पदकांनी सन्मानित करण्यात येईल.
सन्मान होणाऱया स्वातंत्र्यसैनिकांमध्ये 47 गोमंतकीय आणि अन्य राज्यातील 28 जणांचा समावेश असून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना यावेळी सन्मानपत्र भेट देण्यात येईल. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाकडे होणाऱया ध्वजारोहण कार्यक्रमात उपस्थित राहतील.









