महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात –
चित्रलेखा अनिरुद्धाला पुढे म्हणाली – उषा ही बालपणापासूनची माझी अत्यंत जवळची मैत्रिण आहे. तिने ज्यावेळी आपले दु:ख मला सांगितले त्यावेळी मला तिची दया आली. तिला तिच्या प्राणसख्याची गाठ घालून द्यायचीच असा मी निर्धार केला. मी विविध लोकातील तरुण राजपुत्रांची चित्रे काढून तिला दाखवली.
त्यामध्ये द्वारकापुरातील आपलेही चित्र होते. आपले चित्र पाहताच तिने ताबडतोब आपल्याला ओळखले व मला म्हणाली – सखे! भवानीच्या कृपेने माझ्या स्वप्नात येऊन माझ्याशी रतिक्रीडा करणारा माझा प्राणसखा हाच होय. हे ऐकताच मी आकाशमार्गे द्वारकेत येऊन पोहोचले व आपली भेट घेतली. आपल्याला मोहित करून निद्रावश करून इकडे शोणितपुरात घेऊन आले. आता आपली सेवा करणारी ही सुंदर युवती दुसरी तिसरी कोणी नसून उषाच आहे. तिच्याच कल्याणाकरिता मी हे सर्व धाडस केले आहे. आपण तिला प्राणप्रिय असून तिचे आपल्यावर निस्सीम प्रेम आहे. ती तुमच्याशिवाय जगू शकत नाही. आपण तिच्याशी स्वप्नात संग केला आहे.
तरी आता आपण हिच्याशी विवाह करून हिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा. अनिरुद्ध म्हणाला – या इथे हा विवाह कोणत्या पद्धतीने व कसा होणार? त्यावर चित्रलेखा म्हणाली – आपण चिंता करू नये. गांधर्व विवाह हा शास्त्रसंमत असून तो विधिवत् होण्याची सर्व व्यवस्था मी तात्काळ करते. अनिरुद्धाने मनोमन भगवान श्रीकृष्ण, बलरामदादा व पिता प्रद्युम्न यांना वंदन करून विवाहाला मान्यता दिली. चित्रलेखेने लगोलग गंधर्वांचे आचार्य तुंबराचार्य यांना तिथे आणले व त्यांनी उषा व अनिरुद्ध यांचा विधिवत् विवाह लावून दिला. गौरी महादेवाच्या कृपेने अनिरुद्ध हा पती लाभल्याने उषा अत्यंत आनंदी झाली. या विवाहाची कथा मूळ भागवत पुराणात नाही. मग ही कथा कोठून आली असा प्रश्न आपण विचाराल तर त्याचे उत्तर असे की इतर पुराणात ही कथा आली आहे. अनिरुद्ध हा कोणी सामान्य युवक नव्हे. तो भगवान श्रीकृष्णाचा नातू असून तो कोणताही व्यभिचार करणे कसे शक्मय आहे? त्यामुळे त्याने गांधर्व पद्धतीने उषेशी विवाह केला हे खरेच मानावे.
अनिरुद्धें ते निज नोवरी । पर्णिली गान्धर्वविधानसूत्रीं । सहसा खोडीं न काढिजे चतुरिं । शास्त्रद्रष्टारिं सर्वज्ञीं।
विहित विधान करूनि पूर्ण । ओहरां देऊनि आशीर्वचन । तुम्बुरु चित्रलेखा पुसून । जातीं झालीं निज भुवना । कोण्हा नकळत हा वृत्तान्त । चित्रलेखेनें साधिलें कृत्य । गौरीवरें लाहोनि कांत। स्वानंदभरित रमे उषा । सप्तखणाच्या दामोदरिं । उषा कान्तेंसी क्रीडा करी । राखणाइतांची भंवरी । अष्टौ प्रहरिं उदायुध । रिघों न शके पारकें वारें । तेथें कैं पाहों शकेल दुसरें । ऐसिये सदनीं आनंदगजरें । उषा निजवरेंसह क्रीडे। जैसीं क्रीडती शङ्करगौरी । तैसीच उषा सुखसेजारी । स्मरपुत्रेसी क्रीडा करी । सप्रेमगजरिं भयरहित ।
ऍड. देवदत्त परुळेकर