आयएसएसएफ विश्व चषक नेमबाजी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयएसएसएफ विश्व चषक नेमबाजी स्पर्धेच्या सहाव्या दिवशीही भारतीय नेमबाजांनी आणखी दोन सुवर्णपदकांची भर घातली. पुरुषांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन प्रकारात ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने सुवर्ण मिळवित ऐतिहासिक कामगिरी केली तर महिलांच्या 25 मी. पिस्तूल नेमबाजीत भारताने तीनही पदके पटकावत क्वीन स्वीप साधले. चिंकी यादवला सुवर्ण मिळाले तर राही सरनोबतला रौप्य व मनू भाकरला कांस्यपदक मिळाले.
20 वर्षीय ऐश्वर्य तोमरने 462.5 गुण घेत सुवर्ण पटकावले. हंगेरीचा जागतिक अग्रमानांकित इस्तवान पेनीने (461.6) रौप्य तर डेन्मार्कच्या स्टीफन ओल्सेनने (450.9) कांस्यपदक मिळवले. या प्रकारात सुवर्ण मिळविणारा तोमर हा भारताचा सर्वात युवा नेमबाज बनला आहे. त्यानंतर महिलांच्या विभागात चिंकी यादवने अनुभवी राही सरनोबत व मनू भाकर यांना मागे टाकत सुवर्ण पटकावले. भारताची एकूण पदकसंख्या 19 झाली असून त्यात 9 सुवर्ण, 5 रौप्य व 5 कांस्यपदकांचा समावेश आहे.
चिंकी व 30 वर्षीय राही सरनोबत यांच्यात (32 गुण) टाय झाल्यानंतर शूटऑफ घेण्यात आले. त्यात चिंकीने 4-3 अशी बाजी मारली. 19 वर्षीय मनू भाकरने 28 गुण घेत तिसरे स्थान मिळविले. या तिघींही टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत. 2019 दोहामध्ये झालेल्या 14 व्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये दुसरे स्थान मिळवित चिंकी यादवने ऑलिम्पिक तिकीट निश्चित केले होते. येथील स्पर्धेत तिने पहिल्या 20 शॉट्सच्या फेरीत 14 गुण मिळवित आघाडीचे स्थान मिळविले. भाकरने 13 गुण मिळविले. त्यानंतर चिंकीने 21 गुण घेत इतरांना मागे टाकले तर सरनोबतने अंतिम फेरी गाठण्यात यश मिळविले. अंतिम फेरीत चिंकीने पाचही टार्गेट्सचा दोनदा अचूक वेध घेतला. अनुभवी सरनोबतने पहिल्या टप्प्यातील तिसऱया सिरीजमध्ये पाचपैकी पाचदा वेध घेतला तर त्याआधी एलिमिनेशन टप्प्यातील चौथ्या, सातव्या, नवव्या सिरीजमध्ये चारदा अचूक वेध घेतला. मनू भाकरला मात्र फक्त चौथ्या सिरीजमध्ये एकदाच पाचपैकी पाचदा अचूक वेध घेता आला.
तोमरचे पहिले सुवर्णपदक
सकाळच्या सत्रात तोमरने वरिष्ठांच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच सुवर्ण मिळविले. अंतिम फेरी गाठलेल्या अनुभवी संजीव राजपूत व निरज कुमार यांना सहाव्या व आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तोमरने प्रभावी प्रारंभ केल्याने त्याने आघाडी मिळविली होती. पण नंतर त्याची घसरण झाली. मात्र एलिमिनेशन टप्प्यात त्याने 10.4, 10.5, 10.3 गुण नोंदवत पुन्हा आघाडी घेतली. 2019 मधील आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्याने 50 मी. रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्य मिळवित ऑलिम्पिक स्थान निश्चित केले होते. तीन दिवसाआधीच त्याने दीपक कुमार, पंकज कुमार यांच्यासमवेत पुरुषांच्या सांघिक रायफल नेमबाजीत रौप्य मिळविले होते.
या प्रकारात पात्र फेरीत संजीव राजपूतने 1172 गुण घेत आघाडी घेतली होती तर तोमर व दीपक कुमार यांनी प्रत्येकी 1165 गुण मिळविले. इस्तवान पेनी, अलेक्सी लेप्पा (फिनलंड), जान लॉचबिहलर (स्वित्झर्लंड), जुहो कुर्की (फिनलंड), ओल्सेन यांनीही अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत 45 शॉट्सच्या तीन सिरीज नीलिंग, प्रोन, स्टँडिंग पोझिशनमध्ये घेण्यात आल्या. आठ खेळाडूंच्या अंतिम फेरीत तोमरने नीलिंग पोझिशन झाल्यानंतर 155 गुण घेत आघाडीचे स्थान मिळविले तर प्रोननंतर 310.5 गुण घेत दुसरे स्थान मिळविले. ओल्सनने येथे 311.4 गुणांसह आघाडी मिळविली होती. पेनीला (309.9) तिसरे स्थान मिळाले होते. महिलांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशनमध्ये भारतीय खेळाडूंनी निराशा केली. त्यात तेजस्विनी सावंतने 12 वे, अंजुम मोदगिलने 16 वे व सुनिधी चौहानने 17 वे स्थान मिळविले









