@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अभिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय-बच्चन यांची सोमवारी ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. काही काळापूर्वी पनामा पेपर्स पर्दाफाश प्रकरणात ऐश्वर्या यांचे नाव आले होते. त्यामुळे त्यांची चौकशी होत आहे. पनामा पेपर्स प्रकरणात 500 भारतीयांची नावे आहेत. त्या साऱयांची चौकशी सुरु आहे, अशी माहिती ईडीच्या प्रवक्त्याने दिली.
या प्रकरणात ऐश्वर्या यांचे पती अभिषेक बच्चन यांचीही चौकशी यापूर्वी झाली असून अमिताभ बच्चन यांनाही नोटीस पाठविली जाण्याची शक्यता आहे. अभिषेक यांनी काही कागदपत्रे ईडीला दिलेली आहेत. त्यांच्या आधारावर पुढील चौकशी होत आहे, अशीही माहिती ईडीच्या सूत्रांकडून देण्यात आली.
काय आहे प्रकरण
2016 मध्ये ब्रिटनमधून पनामा पेपर्स उघड झाले. जगभरातील अनेक राजकारणी, उद्योगपती व महनीय व्यक्तींनी बेकायदेशीररित्या पैसा विदेशात नेल्याचे आणि तेथे तो साठवून स्वतःच्या देशात करचुकवेगिरी केल्याची प्रकरणे या पनामा पेपर्समधून उघड झाली असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच विदेशात अनेक बनावट कंपन्या सुरु करुन त्या कंपन्यांमध्ये पैसा गुंतविला जाण्याचे प्रकार पनामा पेपर्सच्या माध्यमातून उघडकीस आले होते.
बच्चन कुटुंबाचा संबंध
अमिताभ बच्चन यांना विदेशातील चार कंपन्यांचे संचालक बनविण्यात आले होते. यातील तीन बहामाज या देशातील होत्या, तर एक व्हर्जिन आयलँडमधील होती. या कंपन्या 1993 मध्ये स्थापन करण्यात आल्या होत्या. या कंपन्यांचे भांडवल 5 हजार ते 50 हजार डॉलर्स इतके होते. तथापि, या कंपन्यांचे व्यवहार आणि उलाढाल कोटय़वधी डॉलर्सची होती. व्हर्जिन आयलँडमधील कंपनीचे संचालकपद ऐश्वर्या बच्चन यांनाही देण्यात आले होते. नंतर त्यांना या कंपनीच्या भागधारक (शेअर होल्डर) म्हणून मान्यता देण्यात आली. या कंपनीचे नाव अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड असे होते. ऐश्वर्या राय, त्यांचे पिता, माता आणि बंधूही या कंपनीचे भागीदार होते. ही कंपनी 2005 मध्ये निर्माण करण्यात आली होती. तर 2008 मध्ये ती बंदही करण्यात आली होती. मात्र या कंपनींचे व्यवहार संशयास्पद असल्याचा आरोप आहे. त्यामुळे बच्चन कुटुंबाची चौकशी होत आहे.
जया बच्चन भडकल्या
ऐश्वर्या राय-बच्चन यांची चौकशी ईडीकडून होत असल्याचा प्रश्न राज्यसभेत उपस्थित करण्यात आल्या. सपाच्या राज्यसभेच्या खासदार जया बच्चन (ऐश्वर्या यांच्या सासू) भाजपवर चांगल्याच भडकल्या. ईडीची कारवाई सूडबुद्धीने सुरु आहे. निर्दोष लोकांची बदनामी करण्याचा हा सरकारी कट आहे. सरकारचे बुरे दिन अब शुरु होनेवाले है, अशी शापवाणीही त्यांनी भर राज्यसभेत उच्चारली.









